शरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटले, दोन्ही नेत्यांमध्ये तासभर खलबतं

नवी दिल्ली: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात आज पंतप्रधान कार्यालयात भेट झाली. दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे तासभर चर्चा झाली. लोकसभेचं पावसाळी अधिवेशन आणि नव्या सहकार खात्याची निर्मिती या पार्श्वभूमीवर या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे. (sharad pawar meet pm narendra modi, discuss on various issue)

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सकाळी साडे दहाच्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पंतप्रधान कार्यालयात जाऊन भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये एक तास चर्चा झाली. या भेटीचा तपशील गुलदस्त्यात ठेवण्यात आला आहे. मात्र, नव्याने निर्माण करण्यात आलेलं सहकार खातं, महाराष्ट्रातील आणि देशातील सहकाराचे प्रश्न, सहकार खात्याकडून असलेल्या अपेक्षा आणि बँकिंग संदर्भातील विषयांवर या बैठकीत चर्चा करण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं.कृषी कायद्यावर चर्चा?

संसदेचं अधिवेशन सोमवारपासून सुरू होत आहे. त्यामुळे मोदींसोबतच्या बैठकीत कृषी कायदे, शेतकरी आंदोलन आणि संरक्षणविषयक प्रश्नावरही या बैठकीत चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे.शरद पवार – नरेंद्र मोदींच्या भेटीचा अर्थ काय?

पत्रकार संजय जोग म्हणाले, “या भेटीचा पॉलिटिकल अर्थ वाटत नाही. शरद पवारांनी पंतप्रधानांच्या भेटीची आधीच वेळ मागितली होती. शिवाय बँकिंग रेग्युलेशन अॅक्टबद्दल ऑगस्ट महिन्यात त्यांनी पंतप्रधानांना पत्र लिहिलं होतं. नागरी सहकारी बँकांवर गदा आणली जाईल, आरबीआयकडून अंकूश येऊन महत्त्व कमी होईल, असं पवारांचं म्हणणं आहे.

शिवाय नवं सहकार खातं अमित शाहांकडे आहे. त्यामुळे सहकारसमोरील आव्हानं काय, साखर कारखाने, दूध संस्था यांच्यासमोरील प्रश्नांबाबत चर्चा असू शकते. याशिवाय सध्या शेतकरी आंदोलन 8 महिने सुरु आहे. आजच्या बैठकीत यावरही चर्चा झालेली असू शकते. राष्ट्रवादी आणि भाजप एकत्र येतील असं पवारांनी कधीही संकेत दिलेले नाहीत. त्यामुळे सध्या तशी शक्यता नाही”

तर काँग्रेसच्या जागी भाजप रिप्लेस होऊ शकते

शरद पवारांची मोदींसोबतची चर्चा केवळ प्रशासकीय आहे असं वाटत नाही. पियुष गोयल पवारांना भेटले होते. त्यानंतर राजनाथ सिंह भेटले. त्यानंतर आता मोदी-पवार भेट म्हणजे याला राजकीय अंग आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत समन्वयाचा सर्वात मोठा दुवा शरद पवार आहेत. महाराष्ट्रातील 48 जागा आहेत लोकसभेच्या. त्यामुळे पवारांना महत्त्व आहे. त्या अनुषंगाने आतापासून तयारी असू शकते. महाराष्ट्रात उद्या महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसच्या जागी भाजप रिप्लेस झाली तर आश्चर्य वाटायला नको. २०२२ मध्ये पाच राज्यांच्या निकालाची वाट पाहण्याची गोष्ट करतात. महाराष्ट्रात वेगवान राजकीय घडामोडी घडत आहेत. नाना पटोले सातत्याने पवारांना लक्ष करत आहेत. त्यामुळे काँग्रेसरहीत आघाडी महाराष्ट्रात होऊ शकते का, त्यादृष्टीनेही याकडे पाहायला हवं, असं राजकीय विश्लेषक अशोक वानखेडे यांनी सांगितलं.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area