मुंबई : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांचा स्वबळाचा नारा आणि उलटसुलट वक्तव्यांमुळे गेले काही दिवस महाराष्ट्राच्या राजकारणात बरीच चर्चा आहे. आज शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी नाना पटोले यांच्यावरच अग्रलेख (Saamana Editorial) लिहून नानांचा स्वभाव किती मोकळ्या-ढाकळ्या मनाचा आहे हे सांगताना भाजपमधल्या चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) आणि रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) जसं मनास येईल ते बोलतात तसंच नानांचंही आहे. नाना विदर्भाच्या मातीतील रांगडे गडी आहेत, असं राऊत म्हणाले. तर हे वर्णन करताना राऊतांनी चंद्रकांत पाटील यांना कोपरखळी लगावली आहे. चंद्रकांत पाटील म्हणजे निरागसतेचं लेणं, एक निष्पाप बालक, असा टोमणा राऊतांनी मारलाय.
काय म्हणाले संजय राऊत?
नाना हा विदर्भाच्या मातीतला रांगडा गडी आहे. मनास येईल ते दाणकन बोलतो. भाजपचे चंद्रकांत पाटील वगैरे पुढारीही मनास येईल ते बोलत असतात, पण पाटील हे निरागसतेचे लेणे आहे. ते एक निष्पाप बालक आहेत. त्यांच्या हसण्या-बागडण्याचे महाराष्ट्राला जितके कौतुक तितकेच कौतुक नानांच्या रांगड्या बोलीचे आहे, अशी तुलना संजय राऊत यांनी केलीय. पण ती करत असताना राऊतांनी चंद्रकांतदादांना चिमटे काढण्याची संधी मात्र सोडली नाही.
जसे भाजपात दानवे तसे काँग्रेसमध्ये नाना…!
नाना पटोले हे मोकळ्या ढाकळ्या स्वभावाचे आहेत. जसे भाजपात रावसाहेब दानवे तसे काँग्रेस पक्षात नाना…. नाना प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष झाल्यापासून सतत चर्चेत आहेत ते त्यांच्या वक्तव्यांमुळे. नाना त्यांची मन की बात व्यक्त करतात. सध्याचा अतिजागरूक मीडिया त्यांच्या मन की बातची बातमी करून मोकळा होतो.
नानांची ताजी वक्तव्य चहाच्या पेल्यातली वादळ
मग लोकांना वाटते आता महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप होणार. तीन पक्षांत वाद, फाटाफूट होणार व सरकार पडणार, पण तसे काहीच घडत नाही व नाना त्यांच्या पुढच्या कामास म्हणजे बोलण्यास लागतात. आता पुन्हा नानांच्या ताज्यातवाण्या वक्तव्याने चहाच्या पेल्यातले वादळ निर्माण झाले असे म्हणतात. पण नाना काय बोलतात व कसे डोलतात यावर महाराष्ट्र सरकारचे भवितव्य अजिबात अवलंबून नाही, असं राऊतांनी निक्षून सांगितलं आहे.
नानांच्या बोलण्यामुळे महाविकास आघाडीत फूट पडल्याचं विरोधकांचं चित्र पण…
“नानांच्या बोलण्यामुळे महाविकास आघाडीत फूट पडल्याचे चित्र विरोधकांनी निर्माण केले, पण नानांच्या भाषणाचा आणि आरोपांचा खरा रोख भाजपवरच होता. भाजपशी आमचे जमणार नाही. भाजपला मदत होईल असे काही करणार नाही, असे नाना सांगत आहेत. त्यावर कोणी लक्ष देत नाही. नानांनी त्यांची मन की बात सांगितली. त्या मन की बातने थोडी खळबळ माजली. ठीक आहे, होऊ द्या खळबळ!”, असं राऊत म्हणाले.