मुंबई : आयसीसी टी-20 विश्व विश्वचषकाचा (ICC T20 World Cup 2021) थरार 17 ऑक्टोबर 14 नोव्हेंबर दरम्यान युएई आणि ओमन या देशांमध्ये रंगणार आहे. या भव्य स्पर्धेतील गट आयसीसीने (ICC) नुकतेच जाहीर केले आहेत. यावेळी एकेकाळचा विश्वविजेता संघ अंतिम 12 (T 20 World Cup Super 12) मध्येही स्थान मिळवू शकलेला नाही. त्याला स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आधी ग्रुप स्टेजेसमध्ये जिंकावे लागणार आहे.
हा संघ म्हणजे 2014 सालचा टी-20 विश्वचषक जिंकलेला श्रीलंका क्रिकेट संघ (Sri Lanka Cricket Team) आहे. त्यावेळी स्पर्धेतील सर्वांत ताकदवर संघ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीलंका संघाला आता स्पर्धेत स्थान मिळवण्यासाठीही धडपड करावी लागत आहे. याचे कारण मागील काही काळातील संघाची अत्यंत सुमार कामगिरी. एकेकाळी कुमार संगकारा, महेला जयवर्धने, लसिथ मलिंगा अशा एक न अनेक दिग्गजांचा भरणा असलेल्या संघाला आता साधा एक कर्णधार निवडण्यासाठीही मोठी मेहनत करावी लागत आहे. नुकत्याच इंग्लंड दौऱ्यातील तिन्ही टी-20 मॅचेसमध्येही श्रीलंका संघाला पराभव पत्करावा लागला. आता श्रीलंकेचा संघ भारताचे युवा खेळाडू असणाऱ्या संघासोबत 18 जुलैपासून आणि एकदिवसीय आणि नंतर टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे.
अशी मिळवता येईल स्पर्धेत एन्ट्री
यंदा विश्वचषकाच्या 12 क्रिकेट संघात ‘सुपर 12’ चा थरार रंगणार आहे. यामध्ये ग्रुप 1 मध्ये 6 आणि ग्रुप 2 मध्ये 6 संघ आपआपसांत भिडणार आहेत. ज्यामध्ये दोन्ही गटात प्रत्येकी 4 संघ आधीच निवडले गेले आहेत. पण इतर 4 संघाना सुपर 12 सह स्पर्धेत एन्ट्रीसाठी दोन ग्रुप स्टेजेसमधील सामन्यांत क्वॉलीफाय करावं लागणार आहे. याच ग्रुप्समध्ये श्रीलंकेचा संघ असून त्याला ग्रुप A मधील आयर्लंड, नाम्बिया आणि नेदरलँड संघासोबत जिंकल्यानंतर सुपर 12 मध्ये जागात मिळवता येणार आहे.
4 वर्षात 10 वा कर्णधार!
श्रीलंका संघ 18 जुलैपासून भारताविरुद्ध आधी एकदिवसीय आणि नंतर टी-20 सामने खेळणार आहे. दरम्यान इंग्लंडच्या दौऱ्यात श्रीलंकेचा कर्णधार असणाऱ्या कुसल परेराने सुमार कामगिरी केल्यामुळे संघाला पुन्हा एका नव्या कर्णधारीची गरज निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे मागील 4 वर्षांतील हा श्रीलंका संघाचा 10 कर्णधार असेल. स्थानिक वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, संघाचा अष्टैपूलू खेळाडू दासुन शनाकाला कर्णधारपद सोपवण्याची चर्चा आहे. 29 वर्षीय शनाकाने आतापर्यंत श्रीलंका संघासाठी 28 वनडे आणि 43 टी-20 सामने खेळले आहेत. वनडेमध्ये त्याने 611 धावांसह 10 विकेट घेतले आहेत.तर टी-20 मध्ये 548 धावांसह 11 विकेट्स पटकावले आहेत.