चेन्नई : मानसिकदृष्ट्या अस्थिर असलेल्या तरुणींनी आईची हत्या केल्याची धक्कादायक घटना तामिळनाडूत समोर आली आहे. आईच्या रक्तबंबाळ मृतदेहाशेजारी बसून या मुली बाहुल्यांशी खेळत बसल्या होत्या. 21 वर्षांची नीना आणि 19 वर्षांची रिना या दोन मुलींना पोलिसांनी ताब्यात घेतलं.
42 वर्षीय उषा या तामिळनाडू मुक्त विद्यापीठातील माजी कर्मचारी होत्या. मूगांबिकाई भागात त्या आपल्या दोन मुलींसोबत राहत होत्या. दोन्ही मुली पदवीधर, मात्र मानसिकदृष्ट्या अस्थिर असल्याची माहिती आहे. मुलींच्या दंग्यामुळे शेजाऱ्यांच्या तक्रारी वाढत होत्या. त्यामुळे उषा गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात पलयमकोट्टाई भागातील हाऊसिंग बोर्ड कॉलनीत स्थायिक झाल्या.
त्या दिवशी काय घडलं?
दोन दिवसांपूर्वी उषा आणि दोन मुलींमध्ये झालेल्या भांडणाचे आवाज शेजाऱ्यांपर्यंत पोहोचले. मात्र सवय झालेल्या शेजाऱ्यांनी सुरुवातीला त्याकडे दुर्लक्ष केलं. मात्र आवाज वाढत गेला आणि उषा यांचा मदतीसाठी आरडाओरडा ऐकून इमारतीतील रहिवासी धावत तिथे पोहोचले. मात्र दरवाजा आतून बंद असल्याने कोणालाही आत शिरता आले नाही. परंतु तात्काळ पोलिसांना बोलावण्यात आले.
पोलिसांनी घटनास्थळी येऊन दार तोडून आत प्रवेश केला. त्यावेळी उषा रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या. त्यांच्या अंगावर भोसकल्याच्या खुणा होत्या. नीना आणि रिना आईच्या मृतदेहाजवळ बाहुल्यांनी खेळत बसल्या होत्या. पोलिसांनी दोघींना चौकशीसाठी ताब्यात घेतलं, तिथे एकीने आईची हत्या केल्याची कबुली दिली.
ठाण्यात स्क्रू ड्रायव्हर खुपसून आईची हत्या
दरम्यान, छातीत स्क्रू ड्रायव्हर खुपसून मुलाने आपल्या सख्ख्या आईची हत्या केल्याची धक्कादायक घटना ठाणे जिल्ह्यात उघडकीस आली होती. आरोपी मुलगा कमवलेल्या पैशांची उधळपट्टी करायचा. हत्येच्या दिवशीही पैसे देण्यावरुन मायलेकात वाद झाला. त्यानंतर राग अनावर झाल्याने मुलाने जवळच पडलेला स्क्रू ड्रायव्हर आईच्या छातीत खुपसला. हा वार एवढा गंभीर होता, की आई जागीच गतप्राण झाली. मुंब्रा येथील रेतीबंदर परिसरातून आरोपी मुलाला अटक करण्यात आली आहे.