अवघे 'शांत' पंढरपूर; मंदिर परिसरात शुकशुकाट; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत उद्या महापूजा

पंढरपूर: करोना साथरोगाच्या काळात प्रतिबंधात्मक नियमावलीसह होणाऱ्या विठुरायाच्या सरकारी महापूजेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कुटुंबीयांसह उपस्थित राहणार असून, या वेळी केवळ ४५ ते ५० व्हीआयपी व अधिकारी मंदिरात उपस्थित असतील, अशी माहिती मंदिराचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी रविवारी दिली. उद्या, २० जुलै रोजी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास मुख्यमंत्री विठ्ठल मंदिरात येणार असून, त्यानंतर विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा होईल. महापूजेस मंदिरात येणाऱ्या प्रत्येकाची करोना चाचाणी करण्यात येणार आहे. महापूजेनंतर मंदिर समितीने केलेल्या विठुरायाच्या नवीन प्रतिमांचे अनावरण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते केले जाणार आहे.

आषाढी यात्रेला सरसकट सर्वच भाविकांनी येऊ नये यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली असून, रविवारपासून पंढरपूर शहरासह परिसरातील १० गावात संचारबंदीला सुरुवात झाली आहे. यामध्ये औषध दुकाने आणि दूध विक्रेते याशिवाय कोणालाही दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. पंढरपूरकडे येणारे सर्व ४८ मार्ग पोलिसांकडून बंद करण्यात आले असून, निवडक पालख्यांव्यतिरिक्त अन्य कोणालाही पंढरपूरमध्ये प्रवेश देण्यात येणार नाही. विठ्ठल मंदिर परिसरातही जोडणारे सर्व मार्ग लोखंडी बॅरिकेड लावून बंद करण्याचे काम रविवारी रात्रीपर्यंत सुरू होते. पंढरपुरात केवळ ४०० वारकरी येणार असले तरी करोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेसाठी तीन हजार पोलिस कर्मचारी आणि अधिकारी रस्त्यावर उतरले आहेत.

चंद्रभागेत स्नानाला मनाई

आषाढीला पंढरपूरमधील भाविकांनीही चंद्रभागेत स्नानाला जाऊ नये, यासाठी चंद्रभागेचे सर्व घाट लोखंडी बॅरिकेड लावून बंद करण्यात आले आहेत. सगळीकडे मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सरकारने परवानगी दिलेल्या १० मानाच्या पालखी सोहळ्यांतील ४०० वारकऱ्यांनाच केवळ चंद्रभागेत पादुका स्नानासाठी सोडले जाणार आहे.

कर्मचाऱ्यांची करोना चाचणी

पूजेच्या पार्श्वभूमीवर विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या १३५ कर्मचाऱ्यांची करोना चाचणी करण्यात आली असून सर्व कर्मचाऱ्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. करोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आलेल्या, पुजारी, कर्मचारी व मंदिर समिती सदस्यांना मंदिरात प्रवेश देण्यात येणार आहे, अशी माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area