Video : ‘विठ्ठल विठ्ठल… पाहावा विठ्ठल’, उद्धव ठाकरेंची अप्रतिम फोटोग्राफी, आदित्य ठाकरेंकडून अल्बम ट्वीट

 

मुंबई : आषाढी वारी म्हणजे भक्तीचा अनुपम्य सुख सोहळा. कोरोना संकटामुळे या सुख सोहळ्यावर काहीसं मळभ चढलेलं मागील वर्षी आणि यंदा पाहायला मिळालं. त्यामुळे मोजक्या वारकऱ्यांसह फक्त 10 मानाच्या पालख्यांना यंदा पंढरपुरात प्रवेश देण्यात आला होता. आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सपत्निक, मानाच्या वारकऱ्यांसह विठ्ठलाची शासकीय पूजा केली. त्यावेळी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे आणि शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर उपस्थित होते. विठ्ठलाची शासकीय पूजा पार पडल्यानंतर सायंकाळी आदित्य ठाकरे यांनी एक ट्वीट खास ट्वीट केलं आहे. (Uddhav Thackeray’s Photography, Ashadi Wari’s 2012 Album Tweet from Aditya Thackeray)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे एक उत्तम फोटोग्राफर आहेत. मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार सांभाळण्यापूर्वी ते अनेकदा आपला हा छंद जोपासताना पाहायला मिळत. 2012 साली झालेल्या आषाढी वारीचं उद्धव ठाकरे यांनी चित्रिकरण आणि फोटोग्राफी केली होती. त्याचा एक अल्बमही तयार करण्यात आला होता. सुप्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांनी या ‘विठ्ठ्ल विठ्ठल… पाहावा विठ्ठल’ या अल्बमला आपला आवाज दिला आहे. या अल्बममध्ये उद्धव ठाकरे यांनी आपल्या कॅमेरामधून टिपलेले वारीचे अनेक सुंदर आणि मन मोहून टाकणारे फोटो आणि व्हिडीओ तुम्हाला पाहयला मिळतात. हा अल्बम पाहून कोरोना संकटापूर्वीची वारी तुमच्या डोळ्यासमोरुन गेल्याशिवाय राहत नाही. हाच अल्बम आदित्य ठाकरे यांनी ट्वीट केला आहे.

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात विठ्ठल-रखुमाई यांची शासकीय महापूजा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते संपन्न झाली. यावेळी विठुमाऊलीच्या जयघोषात मंदिराचा गाभारा दुमदुमून गेला. आज सकाळी पहाटे 3 वाजून 40 मिनिटांनी विठ्ठल-रखुमाई यांची शासकीय महापूजा करण्यात आली. यंदा आषाढी वारीच्या महापूजेसाठी वारकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या समवेत विठ्ठल मंदिरातील विणेकरी केशव शिवदास कोलते (वय 71.) आणि इंदुबाई केशव कोलते (वय 60) या दाम्पत्याने महापूजा केली.

“लवकरात लवकर ते वातावरण आपल्याला मिळावे”

“मी भाग्यवान आहे की मला इतक्या जवळून महापूजेचा बहुमान मिळाला. लाखो भाविक कळसाचे दर्शन घेऊन परतत आहेत. मी मोठं काहीही केलेले नाही. तुडुंब पंढरपूर, आनंदाची उधळण असते, ते वातावरण आम्हाला सर्वांना हवंय. लवकरात लवकर ते वातावरण आपल्याला मिळावे, अशी मी विठुराया चरणी प्रार्थना करतो,” असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

मुख्यमंत्र्यासोबत महापूजेचा मान वर्धा जिल्ह्यातील कोलते दांपत्याला

आषाढी वारीच्या महापूजेसाठी वारकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या समवेत विठ्ठल मंदिरातील विणेकरी केशव शिवदास कोलते (वय 71.) आणि इंदुबाई केशव कोलते (वय 60) महापूजा करण्याचा मान मिळाला. केशव कोलते 20 वर्षा पासून श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात विणेकरी म्हणून सेवा बजावत आहेत. त्या सेवेचं त्यांना महापुजेच्या निमित्तांन फळ मिळाल्याचं म्हणावं लागेल. महापूजेचा मान मिळाला आहे कष्टाचं फळ मिळालं आहे. 2000 मध्ये पंढरपूरला आलो. पांडुरंगाकडे कोरोना नष्ट व्हावं, असं मागणं असल्याचं केशव कोलते यांनी सांगितलं. 1972 पासून वारी करत असल्याचंही त्यांनी सांगितलं.

Check it out : - 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area