पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या पुणे दौऱ्याला आजपासून सुरुवात झाली आहे. तीन दिवसाच्या या दौऱ्यामध्ये राज ठाकरे पुण्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते, राज्य उपाध्यक्ष, राज्य सचिव यांच्यासोबतच प्रभाग अध्यक्ष, विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्याही बैठका घेणार आहेत. आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरे यांचा हा दौरा महत्त्वपूर्ण मानला जात आहे.
मनसे पदाधिकाऱ्यांसोबतच्या बैठकांमध्ये काय चर्चा होणार, त्यावर निवडणुकीच्या अनुषंगाने, पक्ष संघटना बांधणीसाठी काय आराखडे तयार केले जाणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. मनसेचे नेते, राज्य उपाध्यक्ष आणि सरचिटणीस यांची बैठक आज झाल्यानंतर उद्या विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी आणि त्यानंतर प्रभाग अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांच्या बैठका राज ठाकरे घेणार आहेत.
मनविसेच्या बैठकीकडेही लक्ष
मनसेच्या विद्यार्थी सेनेचे अध्यक्षपद सोडून आदित्य शिरोडकर यांनी गेल्याच आठवड्यात शिवसेनेत प्रवेश केला. या पार्श्वभूमीवर विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधून मनविसेला सावरण्याचं मोठं आव्हान राज ठाकरेंसमोर असेल.
नाशिका दौऱ्यानंतर मिशन पुणे
नाशिक दौरा आटपून राज ठाकरे सोमवारपासून पुणे दौऱ्यावर आले आहेत. नाशिकमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासोबत राज ठाकरे यांची झालेली 15 मिनिटांची चर्चा सर्वत्र उत्सुकतेचा विषय ठरली होती. राज ठाकरे नाशिकमध्ये आहेत, मीही नाशिकमध्येच आहे. आमच्या वेळा जुळल्या तर राज यांच्यासोबत एक कप चहा घ्यायला काहीच हरकत नाही, असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं, त्यानंतर लगेचच या दोन्ही नेत्यांच्या वेळाही जुळल्याचं दिसलं.
चंद्रकांत पाटलांशी चर्चा
राज ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांची रविवारी सकाळी नाशिकच्या विश्रामगृहाच्या दारातच भेट झाली. राज यांच्या वाहनांचा ताफा येत असताना चंद्रकांत पाटील यांचा ताफा विश्रामगृहाबाहेर जात होता. त्यावेळी चंद्रकांत पाटलांनी गाडीतून उतरून राज ठाकरेंना नमस्कार केला. त्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये विश्रामगृहाबाहेरच 15 मिनिटं चर्चा झाली. यावेळी राज ठाकरे हाताची घडी घालून उभे होते. तर चंद्रकांतदादा त्यांना हातवारे करून काही तरी सांगत होते. राज हे सर्व काही गंभीरपणे ऐकत होते. अनेक वेळा राज हे चंद्रकांतदादांच्या बोलण्यावर मान डोलवतानाही दिसत होते.