मुंडे भगिनी नाराज नाहीत तर अभिनंदनाचं एक ट्विट का नाही? फडणवीस म्हणाले, बदनाम करू नका? वाचा सविस्तर

 


नाशिक: केंद्रात प्रीतम मुंडे यांना मंत्रिपद न मिळाल्याने मुंडे भगिनी नाराज असल्याची जोरदार चर्चा आहे. विशेष म्हणजे या दोन्ही भगिनींनी एकाही मंत्र्याचं अभिनंदन न केल्याने तर त्यांच्या नाराजीच्या चर्चांनी अधिकच जोर धरला आहे. याबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना विचारलं असता ते भडकले. कोण म्हणतं मुंडे भगिनी नाराज आहेत. तुम्हाला कुणी सांगितलं? असा सवाल करतानाच उगाच काहीही बदनामी करू नका, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

देवेंद्र फडणवीस नाशिकमध्ये आले असता मीडियाने त्यांना गराडा घातला. यावेळी त्यांना काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या विस्तारावर प्रश्न विचारण्यात आले. यावेळी प्रीतम मुंडे यांना केंद्रात मंत्रिपद न मिळाल्याने प्रीतम यांच्यासह पंकजा मुंडेही नाराज असल्याची चर्चा आहे. नाराज नाही तर मग मुंडे भगिनींनी ट्विट का केलं नाही?, असा सवालही फडणवीसांना करण्यात आला. या प्रश्नावर फडणवीस काहीसे भडकले. तुम्हाला कोणी सांगितलं त्या नाराज आहेत. कृपा करून कारण नसतान त्यांना बदनाम करू नका. भाजपमध्ये सर्व निर्णय सर्वोच्च नेते घेतात. योग्यवेळी निर्णय होत असतात. त्यामुळे मुंडे भगिनी नाराज असल्याचं सांगून त्यांची अकारण बदनामी करू नका, असं फडणवीस म्हणाले.

नाराज नाही तर ट्विट का नाही?

देवेंद्र फडणवीस हे मुंडे भगिनी नाराज नसल्याचं म्हणत आहे. जर मुंडे भगिनी नाराज नाहीत तर त्यांनी मंत्र्यांच्या अभिनंदनाचं ट्विट का केलं नाही? निदान महाराष्ट्रातील मंत्र्याचं अभिनंदन करण्याचं ट्विट का केलं नाही? डॉ. भागवत कराड हे ओबीसी नेते आहेत. त्यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. विशेष म्हणजे ते मराठवाड्यातील आहेत. तरीही मुंडे भगिनींनी कुणाचेच अभिनंदन न केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. भाजपच्या महाराष्ट्रातील बहुतेक बड्या नेत्यांनी आणि खासदारांनी केंद्रातील नव्या मंत्र्यांचं अभिनंदन केलं आहे. केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या महाराष्ट्रातील मंत्र्यांचंही अभिनंदन केलं आहे. असं असताना मुंडे भगिनींनी अभिनंदनाचं ट्विट न करणं त्या नाराज असल्याचे संकेत देत असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे.

खुलाश्याचं ट्विट तत्परतेने, मग अभिनंदनाचं का नाही?

काल मंत्री मंडळात कुणाकुणाची वर्णी लागणार याबाबत अनेक चर्चा रंगत होत्या. अनेकांची नावं पुढे येत होती. त्यातच प्रीतम मुंडे यांना मंत्रिपद मिळणार असून त्या दिल्लीकडे रवाना झाल्याची बातमी आली. ही बातमी सर्वच मीडियात झळकली. संपूर्ण देशभर ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी लगोलग ट्विट करून खुलासा केला. खासदार प्रीतम मुंडे दिल्लीत दाखल झाल्याची बातमी मी स्वतः पाहिली. ती बातमी चुकीची आणि खोटी आहे. मी, प्रीतमताई आणि आम्ही सर्व कुटुंबीय आमच्या मुंबईच्या निवासस्थानी आहोत, असं ट्विट पंकजा यांनी केलं. हे ट्विट प्रीतम यांनी रिट्विट केलं. माध्यमात चाललेल्या चुकीच्या बातमीवर मुंडे भगिनी ट्विट करू शकतात, तर नव्या मंत्र्यांचं अभिनंदन का करू शकत नाही?, असा सवालही या निमित्ताने विचारला जात आहे.

मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी पत्ता कट?

कारण चर्चा प्रीतम मुंडेंच्या नावाची होती आणि लॉटरी मात्र भागवत कराडांना लागलीय. प्रीतम मुंडे आणि भागवत कराड दोन्ही ओबीसी, वंजारी समाजातून येतात. मंत्रिपद कुणाला द्यायचं म्हटलं तर थेट चर्चा प्रीतम मुंडेंचीच होते, झालीय. त्याला दोन कारणं. पहिलं गोपीनाथ मुंडेंची कन्या आणि दुसरं पंकजा मुंडे. त्यातही पंकजांची नाराजी दूर करण्यासाठी प्रीतम मुंडेंना केंद्रात संधी दिली जाईल अशी यावेळेस तरी जोरदार चर्चा होती पण ही पुन्हा फक्त चर्चाच ठरलीय. उलट प्रीतमला डावलून भागवत कराडांना मंत्री केल्यामुळे मुंडे भगिनी आणखी दुखावल्या जातील अशीच आता चर्चा आहे. कारण वंजारी समाज म्हणजे फक्त मुंडे भगिनींची मक्तेदारी नाही असा तर संदेश भाजपालाच त्यांना द्यायचा नसेल ना? अशीही चर्चा आहे.

मुंडेंऐवजी कराडांना संधी का?

राष्ट्रवादीनं राज्यात ओबीसी नेत्यांना मंत्रिमंडळात संधी दिलीय. त्यातल्या त्यात वंजारी समाजातून येणाऱ्या धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड ही नेतेमंडळी कॅबिनेटमध्ये आहेत. पंकजांच्या पराभवानंतर भाजपात वंजारी नेत्यांना स्थान दिलं जात नसल्याची ओरड सुर झाली. त्यानंतरच आधी रमेश कराडांना संधी दिली आणि आता भागवत कराडांना थेट मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान. यातून एक संदेश स्पष्ट आहे. ज्या समाजाच्या जोरावर मुंडे भगिनी राजकारण करतायत त्यांच्या त्या एकट्याच नेत्या नसून इतरही आहेत हा संदेश पक्षच देत असल्याचं दिसतंय. त्यात काही वावगही नाही. उलट नवं नेतृत्व उभं राहतंय हे भाजपसाठी चांगलंच आहे. पण मुंडे भगिनींचं हे खच्चीकरण तर केलं जात नाही ना अशी चर्चा करण्यास नक्कीच वाव आहे. 


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area