नाना पटोले सनसनाटी बोलून जाणिवपूर्वक चर्चेत रहायचा प्रयत्न करतायत का?; वाचा सविस्तर

 

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी खासदारांचं ऐकूनच घेत नाहीत, असा आधी केलेला आरोप… त्यानंतर तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारने फोन टॅप केल्याचा आरोप… आणि आता थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्यावर पाळत ठेवत असल्याचा टाकलेला बॉम्ब गोळा… या एक ना अनेक विधानांमुळे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सतत चर्चेत असतात. त्यामुळे राजकारणात खळबळही उडते. खळबळजनक आरोप करताना मित्र पक्षच काय ते स्वपक्षीयांनाही सोडत नाहीत. त्यामुळे केवळ चर्चेत राहण्यासाठी नाना पटोले सनसनाटी आरोप करत असतात का? अशी चर्चा होत असते. खरोखरच चर्चेत राहण्यासाठी पटोले अशी विधाने करतात का? की त्यामागे काही रणनीती असते? याचाच घेतलेला हा आढावा. (why Nana Patole passing comments against own government?, read full story)

ताजा आरोप काय?

दोन दिवसांपूर्वी नाना पटोले लोणावळ्यात होते. त्यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना आघाडी सरकारलाच घेरलं. “त्यांच्याकडे गृहमंत्री आणि मुख्यमंत्रिपद आहे. त्यामुळे यंत्रणांना सर्व रिपोर्ट त्यांना द्यावे लागतात. कुठे कुठे काय चालू आहे, आंदोलन कुठे काय चालू आहे, हे सगळं त्यांना अपडेट द्यावे लागतात. मी कुठे काय करतो ते सगळं त्यांना माहीत आहे. महाराष्ट्रात काँग्रेस उभी राहत आहे हे त्यांना माहीत आहे. त्यांच्या पायाखालची वाळू सरकत आहे. हे त्यांना माहीत नाही का? ते कुठे ना कुठे आपल्याला पिंजऱ्यात आणायचा प्रयत्न करणार,” असं पटोले म्हणाले होते.

आक्रमक आहेच, पण…

नाना पटोले हे आक्रमक आहेत. त्यामुळे अनेकदा ते स्वत: अडचणीत येतात. त्यांची ही सवय आताची नाही. काँग्रेसमध्ये असतानाही भाजपमध्ये जाण्यापूर्वी त्यांनी प्रफुल्ल पटेल यांना आव्हान दिलं होतं. पटेलांविरोधात त्यांनी लोकसभेची निवडणूक अपक्ष म्हणून लढवली होती. त्यावेळी त्यांची वक्तव्ये गाजली होती. मोठमोठी वक्तव्ये ते करत असतात. आक्रमकपण आहेच. पण आक्रमकपणा आणि त्याला आघाडी म्हणून पाळायची पथ्य यातील त्यांचं भान सुटतं अनेकदा, असं ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक अभय देशपांडे यांनी सांगितलं. महाराष्ट्रात काँग्रेसवर अन्याय होतो आणि ही दोन पक्ष कुणाला विचारतच नाही, ही भावना होती म्हणून त्यांना अध्यक्ष केलं. त्यामुळे त्यांनी आक्रमक भूमिका घेणं हे अपेक्षित आहेच. पण ती भाषा आक्रमकच असली पाहिजे असं नाही, असंही देशपांडे यांनी सांगितलं.

दोन्ही पक्षात अस्वस्थता वाढवण्याची स्ट्रॅटेजी

यात दोन गोष्टी येतात. एक तर त्यांना प्रसिद्धीच्या झोतात राहता येतं. प्रसिद्धी माध्यमांचा रोख ते त्यांच्याकडे वळवतात. दुसरं म्हणजे महाआघाडी सरकारमध्ये काँग्रेसला शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून जो सन्मान मिळायला पाहिजे तो त्या तुलनेत काहीच मिळत नाहीये. जर काँग्रेसची बार्गेनिंग पॉवर वाढवायची असेल तर पटोलेंनी आक्रमक राहणं किंवा असे आरोप करणं आणि दोन्ही पक्षात अस्वस्थता ठेवणं हा त्यांच्या स्ट्रॅटेजीचा भाग आहे, असं ‘आपलं महानगर’चे ठाणे आवृत्तीचे निवासी संपादक सुनील जावडेकर यांनी सांगितलं.

हा तर दबाव तंत्राचा भाग

पटोलेंच्या या आक्रमकपणामुळे आघाडीला नख लावण्याचा प्रकार होणार नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादी मुरलेले पक्ष आहेत. ते सत्ता सहजासहजी सोडणार नाहीत. शिवसेना जोपर्यंत गडबड करत नाहीत तोपर्यंत दोन्ही काँग्रेस सत्ता सोडणार नाही. मोदी जोपर्यंत सत्तेत आहेत. तोपर्यंत काँग्रेसला कुठेही स्थान नाही, हे या पक्षांना माहीत आहे. आता सत्ता मिळाली ते केवळ उद्धव ठाकरेंमुळे. नाही तर ही सत्तेची पदे त्यांना मिळाली नसती. हे त्यांना माहीत होतं. आता फक्त अधिकाधिक सत्तेची फायदे लाटण्याचा प्रयत्न आहे. हा त्यांच्या दबाव तंत्राचा भाग आहे, असं जावडेकर यांनी सांगितलं.

प्रसिद्धीचा स्टंट आहे असं वाटत नाही

सरकारमध्ये ताणतणाव असू शकतात. पटोले हे सडेतोड भूमिका असलेले नेते आहेत. काही तरी करून दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी असल्याने आगळंवेगळं करून दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यामागे त्यांची भूमिका आहे. त्यामुळेच कार्यकर्त्यांना संबोधित करताना काही वक्तव्ये तोंडून निघतात. त्यांच्या विधानामागे काही राजकारण आहे किंवा प्रसिद्धीचा स्टंट आहे असं वाटत नाही, असं औरंगाबादमधील ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश्वर खंदारे यांनी सांगितलं. (why Nana Patole passing comments against own government?, read full story)

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area