अकोल्यात हवाल्याची ४३ लाखांची रोकड जप्त

 

अकोला : अकोल्यावरून मुंबईकडे जाणाऱ्या विदर्भ एक्स्प्रेसमध्ये एका प्रवाशाकडे सुमारे ४३ लाख रुपयांची रक्कम देण्याच्या बेतात असलेल्या एका युवकास अकोला रेल्वेस्थानकावर सुमारे ४३ लाख ३०० रुपयांच्या रोकडसह अकोला आरपीएफने गुरुवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास ताब्यात घेतले. या रकमेचे कोणतेही दस्तावेज नसल्याने ही रक्कम हवाल्याची असल्याची माहिती समोर आली आहे.

सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शासकीय दूध डेअरी परिसरात असलेल्या शास्त्री नगर येथील रहिवासी मनोज हरिराम शर्मा (२२) हा सुमारे ४३ लाख ३०० रुपयांची रोकड असलेली बॅग घेऊन रेल्वेस्थानकावर होता. ही बॅग तो विदर्भ एक्स्प्रेसमध्ये मुंबईकडे प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाकडे देणार होता; ती बॅग ज्या प्रवाशाकडे देणार होता त्या प्रवाशाचे नाव किंवा इतर माहिती शर्मा याच्याकडे नव्हती, मात्र दि पप्पी शॉप स्टेशन रोडच्या मालकाने बोगी बी ४ च्या दारात उभ्या असलेल्या अज्ञात व्यक्तीच्या हातात देण्याचा इशारा शर्मा यास करण्यात आला होता; मात्र याची माहिती अकोला आरपीएफला मिळताच त्यांनी रेल्वेस्थानकावर सापळा रचला. मनोज शर्मा हा रोकड असलेली बॅग रेल्वेतील प्रवाशाच्या हातात देत असताना अकोला आरपीएफने छापा टाकून त्यास ताब्यात घेतले. रेल्वेतील प्रवासी हा आतमध्ये निघून गेला; मात्र अकोला आरपीएफच्या ताब्यात मनोज शर्मा लागला. तसेच रक्कमही जप्त करण्यात आली आहे. या रकमेचे विवरण तसेच दस्तावेज मागितले असता मनोज शर्मा याने दस्तावेज देण्यास असमर्थता दर्शविली. त्यामुळे ही रक्कम हवाल्याची असल्याचे निष्पन्न झाले. हे प्रकरण अकोला आरपीएफने जीआरपीकडे पाठविले आहे. या प्रकरणाचा तपास जीआरपी पोलिसांनी सुरू केला असून नेमकी रक्कम कोणाची आहे, याचा शोध घेण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area