दत्तवाड परिसरातील अल्पवयीन मुलीचा घातपात

 

कुरुंदवाड: दत्तवाड (ता. शिरोळ) परिसरातील एका अल्पवयीन मुलीचा घातपात झाल्याचे आज रात्री स्पष्ट झाले. तिचा मृतदेह कर्नाटकातील मांजरी हद्दीतील कल्लोळ बंधान्याजवळ सापडला आहे. पोलिसांनी या प्रकरणी तिच्या नात्यातील एका जवळच्या व्यक्तीला ताब्यात घेतले.

कुरुंदवाड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक चंद्रकांत नरावडे यांनी सांगितले, की घटनाक्रम गुंतागुंतीचा आहे. तपास अपूर्ण आहे. त्यामुळे नेमका गुन्हा आम्ही उद्या (ता. १७) दाखल करीत आहोत. 

पोलिसांनी दिलेली माहिती अशी  संबंधित मुलीचा मृतदेह कृष्णा नदीवरील कल्लोळ बंधारा (मांजरी, ता. चिक्कोडी) येथे सापडला. ती गावातून शनिवार (ता. १४) पासून बेपत्ता होती. ती दानवाड येथील दूधगंगा नदीवरील पुलावर बेपत्ता झाल्याची माहिती मिळालेली आहे. तिच्या वडिलांनी मुलगी बेपत्ताची तक्रार शिरोळ पोलिस ठाण्यात दिली होती. या माहितीच्या आधारे रेस्क्यू फोर्सचे जवान व पोलिसांनी दोन यांत्रिक बोटींच्या सहाय्याने दानवाड ते मांजरी पूल अशी ४० किलोमीटरपर्यंत शोधमोहीम सुरू ठेवली होती. 

दोन दिवसांनी म्हणजे आज दुपारी तिचा मृतदेह सापडला. तिची ओळख पटली आहे. दत्तवाड ग्रामीण रुग्णालयात विच्छेदन करून मृतदेह संबंधित कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला आहे. दूधगंगा पूल आणि त्यानंतर कृष्णेत ४० किलोमीटर दूरपर्यंत सापडलेला मृतदेह या साऱ्या कंगोऱ्यांचा तपास करून उद्या या संदर्भातील गुन्हा दाखल करण्यात येईल, असे पोलिस निरीक्षक नरावडे यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area