गाझियाबाद : केवळ २५१ रुपयांत स्मार्टफोन उपलब्ध करून देण्याचा दावा करणाऱ्या 'रिंगिंग बेल्स' या धोकेबाज कंपनीचा संचालक
मोहीत गोयल याला पोलिसांनी अटक केलीय. 'फ्रीडम २५१' या नावानं एक स्कीम बाजारात उतरवून अनेकांना गंडा घातल्यानंतर मोहीत चर्चेत आला होता. २०० कोटी रुपयांच्या सुक्या मेव्याच्या घोटाळ्यातही तो पोलिसांना हवा होता. मात्र, आणखी एका ४१ लाख रुपयांच्या खंडणी प्रकरणी पोलिसांनी मोहीतला सोमवारी ग्रेटर नोएडा भागातून अटक केलीय.४१ लाख रुपयांची खंडणी
मोहीत गोयल याला इंदिरापुरम पोलिसांनी मंगळवारी न्यायालयासमोर हजर केलं. यावेळी न्यायालयानं त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय.
इंदिरापुरमचा रहिवासी असलेल्या विकास मित्तल यानं मोहीतविरुद्ध इंदिरापुरम पोलीस स्टेशनमध्ये हत्येचा प्रयत्न, ४१ लाखांची खंडणी यांसहीत वेगवेगळ्या आठ कलमांखाली गुन्हा दाखल केला होता. याच प्रकरणात पोलिसांनी मोहीतविरुद्ध कारवाई करत त्याला अटक केली.
सोमवारी मोहीतला गौतमबुद्ध नगरमधून ताब्यात घेतल्याचं गाझियाबादचे पोलीस अधिक्षक ज्ञानेंद्र सिंह यांनी म्हटलंय. मोहीतची चौकशी करत असताना त्याच्याविरोधात देशातील वेगवेगळ्या राज्यांत ३५ गुन्हे दाखल असल्याचं समोर आलं. मोहीत गोयल याच्यावर ४०० कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोपही आहे.