नवी दिल्ली - राजस्थानमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी एक घटना घडली आहे. झुंझुनं येथील एका गावामध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या भयंकर घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने 14 वर्षीय मुलीला एका खोलीत बंद केलं. मुलीने खूप आरडाओरडा केला. याच दरम्यान तिचा भाऊ आला. बहिणीच्या ओरडण्याचा आवाज ऐकून भावाने दरवाजा उघडण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र दरवाजा उघडला गेला नाही. यानंतर हतबल झालेल्या भावाने हात जोडून बहिणीला सोडण्यासाठी खूप विनवण्या केल्या. पण आरोपीने काहीच ऐकलं नाही.
पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 19 वर्षीय तरुणाने याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. 3 ऑगस्ट रोजी बहीण घरी एकटीच होती. याच दरम्यान सोमेश नायक त्याच्या घरामध्ये जबरदस्तीने घुसला. धमकी देत आरोपीने बहिणीला एका खोलीत बंद केलं आणि तिच्यावर बलात्कार केला. घरी आल्यावर तरुणाला बहिणीच्या ओरडण्याचा आवाज ऐकू आला. त्याने खोलीचा दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला. पण काहीच फायदा झाला नाही. त्यानंतर जवळपास दोन तास दरवाजाबाहेर उभं राहून भावाने बहिणीला सोडण्याची विनवणी केली पण आरोपीने ऐकलं नाही.
तरुणाच्या मदतीसाठी कोणीच आलं नाही. त्यामुळे तो आपल्या मोठ्या बहिणीला बोलवण्यासाठी तिच्या घरी गेला. तो परत आला तेव्हा आरोपी फरार झाला होता. पोलिसांत तक्रार केली तर जीवे मारण्याची धमकी देखील आरोपीने तरुणाला दिली आहे. घाबरलेल्या तरुणाने तीन दिवसांनी आरोपी विरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. आरोपीला पकडण्यात पोलिसांना आता यश आलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.