डीएसकेंच्या पत्नीचा जामीन मंजूर; मात्र कारागृहातून मुक्तता नाही

पुणे : ठेवीदार संरक्षण कायदयान्वये (एमपीआयडी) गुंतवणूकदारांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणात बांधकाम व्यावसायिक दीपक सखाराम कुलकर्णी (डीएसके) यांची पत्नी हेमंती कुलकर्णी यांना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. तर डीएसके यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश पी. डी. नाईक यांनी हा निकाल दिला. परंतु, केवळ एकाच केसमध्ये हेमंती कुलकर्णी यांना जामीन मंजूर झाला. त्यामुळे त्यांची कारागृहातून मुक्तता होणार नाही.

यापूर्वीही डीएसके आणि हेमंती कुलकर्णी यांचा जामीन अर्ज ३० नोव्हेंबर २०१९ साली येथील सत्र न्यायालयाने फेटाळला होता. दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर डीएसके, त्यांची पत्नी हेमंती आणि सई वांजपे यांनी जामीन मिळावा म्हणून कोर्टात अर्ज दाखल केला होता. डीएसके यांचे बंधू मकरंद कुलकर्णी यांच्यासह काहींना या प्रकरणात जामीन मंजूर करण्यात आला तर डीएसके दांपत्यांचा जामीन नाकारण्यात आला होता.


जामीन मिळण्यासाठी हेंमती कुलकर्णी यांनी पुनश्च आशुतोष श्रीवास्तव यांच्या वतीने अर्ज केला. हेंमती या गेल्या साडेतीन वर्षांपासून तुरुंगात आहे. त्यांना शिक्षा झाल्यास त्यास असलेल्या तरतुदीनुसार त्यांनी अर्धी शिक्षा भोगली आहे. त्यांचे वय आणि कोरोना स्थितीचा विचार करता हेंमती यांना जामीन देण्यात यावा, असा युक्तिवाद अँड. श्रीवास्तव यांनी केला.


डीएसकेंवर देशात सुमारे ४५० हून अधिक गुन्हे दाखल

दरम्यान, डीएसके, त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती आणि त्यांच्या विविध कंपन्यांवर ठेवीदारांची फसवणूक व इतर विविध कलमांनुसार देशात सुमारे ४५० हून अधिक गुन्हे दाखल आहेत. पुणे, सोलापूर, नाशिक आदी विविध भागांमधून त्यांच्यावरचे जवळपास ३५० ते ४०० वॉरंट प्रलंबित आहेत. हेमंती कुलकर्णी यांना केवळ एमपीआयडी कायद्याअंतर्गत दाखल गुन्हयात जामीन मंजूर झालेला आहे. त्यामुळे त्यांची कारागृहातून मुक्तता होणार नसल्याचे सांगण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area