तिहार तुरुंगात बसून कैद्यानं गोळा केली २०० कोटींची माया, 'ईडी'नं असं फोडलं बिंग

 

चेन्नई / नवी दिल्ली : अंमलबजावणी संचलनालयानं (Enforcement Directorate) एका खंडणी प्रकरणात चेन्नईत केलेल्या छापेमारीत एक धक्कादायक बाब उघडकीस आलीय. या कारवाईत अंमलबजावणी संचलनालयानं कोट्यवधी रुपयांचा बंगला तसंच १६ लक्झरी गाड्या जप्त केल्या आहेत. ही सगळी माया

सुकेश चंद्रशेखर या कैद्यानं तिहार तुरुंगात बसून गोळा केल्याचं समजल्यानंतर अधिकाऱ्यांनाही धक्का बसलाय. २०० कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणात ईडीनं ही कारवाई केली.


या प्रकरणात अधिकाऱ्यांनी सुकेश चंद्रशेकर याची पत्नी लीना मारिया पॉल हिचीदेखील चौकशी केली. लीना ही मल्याळम सिनेमांत हिरोईन म्हणून काम करते. तसंच तीनं हिंदी सिनेमा 'मद्रास कॅफे'तही एक छोटी भूमिका निभावलीय.


एका मनी लॉन्ड्रींग प्रकरणात अंमलबजावणी संचलनालयाचा तपास सुरू होता. याच दरम्यान काही फोन कॉल तपास यंत्रणेच्या हाती लागले. सरकारी अधिकारी असल्याची बतावणी करत एक व्यक्ती चौकशी संपुष्टात आणण्याच्या गोष्टी करत होता. त्यानंतर ईडीनं या प्रकरणाचा तपास सुरू केला.


सरकारी अधिकाऱ्याच्या नावावर करण्यात आलेला फोन कॉल VoIP कॉल असून तो Spoof करण्यात आल्याचं चौकशीत समोर आलं. त्यामुळे, हा नंबर कुणाचा आहे? हे तपासण्यात अडथळे येत होते.


मात्र, तपासाअंती दिल्लीतल्या तिहार तुरुंगात बंद असलेला एक कैदी हे फोन कॉल्स करत असल्याचं समोर आलं. या गुन्हेगाराचं नाव सुकेश चंद्रशेखर आहे. तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्या मृत्यूनंतर AIADMK पक्षाचं निवडणूक चिन्ह शशिकला यांना मिळवून देण्यासाठी निवडणूक अधिकाऱ्यांना लाच देत असताना त्याला अटक करण्यात आली होती. त्यानंतर तो रोहिणी तुरुंगात बंद आहे.

गुन्हेगाराचा सुगावा लागल्यानंतर ईडीच्या अधिकाऱ्यांनी पीडितांना विश्वासात घेत गुन्हा दाखल करण्यास सांगितलं. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलला तक्रार मिळताच दीपक रामदानी आणि प्रदीप रामदानी या दोन जणांना अटक करण्यात आली. हे दोघे जण सुकेशच्या सांगण्यावरून खंडणी वसूल करत होते. तुरुंगात छापा टाकून सुकेशकडून दोन मोबाईल फोन जप्त करण्यात आले. या फोनच्या सहाय्यानं तो खंडणीसाठी कॉल करत होता. तुरुंगात सुकेशची मदत करण्यासाठी तुरुंगातील दोन कर्मचाऱ्यांनाही अटक करण्यात आलीय.


चार जणांच्या अटकेनंतर हे प्रकरण स्पेशल सेलकडून दिल्ली पोलिसांच्याा आर्थिक गुन्हेगारी शाखेकडे सोपवण्यात आलं. तपासात खंडणीत २०० कोटी रुपयांची रक्कम गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात देण्यात आल्याचं समोर आलं. धक्कादायक म्हणजे, नकदी स्वरुपात हे पैसे देण्यात आले होते. तसंच काही पैसे दुबई आणि हाँगकाँगलाही पाठवण्यात आले होते. सुकेश चंद्रशेखरनं तुरुंगात बसून सुरक्षा अधिकाऱ्यांच्या नाकावर टिच्चून ही सगळी माया गोळा केली होती.

या कामासाठी रत्नाकर बँक लिमिटेडचे उपाध्यक्ष कोमल पोद्दार यानंही सुकेशची मदत केली. बदल्यात त्यालाही कमिशन देण्यात आलं. हे समोर आल्यानंतर ईडीनं कोमल पोद्दारलाही अटक केलीय.

२०० रुपयांच्या खंडणीच्या रक्कमेतून सुकेश चंद्रशेखरनं चेन्नईच्या समुद्रकिनाऱ्याजवळच एक आलिशान बंगला खरेदी केला. लक्झरी आणि सगळ्या आधुनिक सोई-सुविधांनी युक्त अशा या बंगल्यात सुकेशची पत्नी लीना राहत होती. महागड्या वस्तू, कपडे आणि बुटांपासून अनेक गोष्टी ईडीला तपासात सापडल्या. पॅरोलवर तुरुंगाबाहेर पडल्यानंतर सुकेश याच घरात राहून ऐशोआरामात आयुष्य जगत होता.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area