पुण्यात मेट्रो कारशेडमध्ये फायरिंग! मेट्रो कर्मचारी जखमी, रिकामी काडतुसंही सापडली

 

पुणे : पुण्यात कोथरूड (Kothrud) परिसरात गोळीबार (Firing) झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मेट्रो कारशेडच्या (Metro Car shed) भागात काल संध्याकाळी हा गोळीबार झाला आहे. या गोळीबारात मेट्रोचा एक कर्मचारी जखमी झाल्याचं वृत्त आहे. गोळीबारासोबतच या परिसरात काही रिकामी काडतुसंही आढळून आली आहेत. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. (firing at the kothrud metro carshed area and one employee was injured)

कर्मचाऱ्याच्या पायाला चाटून गेली गोळी

कोथरुड परिसरात असलेल्या मेट्रोच्या या कारशेडमध्ये सध्या काम सुरू आहे. अनेक कामगार त्याठिकाणी काम करत असतात. बुधवारी संध्याकाळी काम सुरू असताना अचानक बंदुकीच्या गोळ्यांचा आवाज आला. यापैकी एक गोळी कारशेडमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्याच्या पायाला चाटून गेली. यामध्ये हा कर्मचारी किरकोळ जखमी झाला आहे. यावेळी कर्मचाऱ्यांना बंदुकीच्या गोळ्यांची काही रिकामी काडतुसंही आढळून आली. या घटनेनंतर कोथरुड पोलिस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.

कोणी केला गोळीबार?

मेट्रो कारशेडच्या काही अंतरावर लष्करी जवानांचे प्रशिक्षण केंद्र आहे. या प्रशिक्षण केंद्रात एखाद्या जवानाच्या बंदूकीतून झाडलेली गोळी मेट्रो कारशेडमध्ये आली असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र, याबाबत अद्याप कुणीही अधिकृत दुजोरा मिळू शकलेला नाही. त्यामुळे खरंच गोळीबार झाला का? आणि तो कुणी केला हे प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहेत. या ठिकाणी फायरिंग कुणी केली, बंदुकीच्या गोळ्या नेमक्या कुठून आल्या, याचा तपास कोथरूड पोलीस करीत आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area