जनआशीर्वाद यात्रेतील पाकीटमार गजाआड; मालेगावच्या चौघांना अटक, मोबाइल लोकेशनमुळे सापडले शीळफाट्यात

ठाणे : भाजपने काढलेल्या जनआशीर्वाद यात्रेत सहभागी झालेल्यांचे पाकीट मारणाऱ्या चार जणांच्या टोळीला ठाणे पोलिसांनी अखेर अटक केली आहे. हे चारही आरोपी मालेगाव येथील रहिवासी आहेत. ते या यात्रेत कार्यकर्ते म्हणून सहभागी झाले असल्याची माहितीही तपासात समोर आली आहे. ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेने अबुबक्र अन्सारी (३५), नदीम अन्सारी (३०), आतिक अहमद (५१) आणि अश्याक अन्सारी (३८) यांना अटक केली आहे.  त्यांच्याकडून चोरलेली एक लाख १९ हजार रुपयांची रोकड, १० मोबाइल जप्त केले. चौघांनीही खास जनआशीर्वाद यात्रेत खिसे कापण्यासाठी मालेगाव ते ठाणे असा प्रवास केला होता.

सोमवारी यात्रेची सुरुवात आनंदनगर येथील मंडपात झाली. त्यावेळी एक भाजप नेता तेथे आले असता पदाधिकाऱ्यांनी त्यांच्याभोवती गराडा घातला.  या चोरट्यांनी गर्दीत कोणाला संशय येऊ नये म्हणून भाजपचे चिन्ह असलेल्या मास्कचा वापर करून या नेत्याच्या खासगी स्वीय सहायकाच्या खिशातील एक लाख रुपये गायब केले. त्यानंतर एका पत्रकाराचे १५ हजार रुपये तसेच काही  कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांच्या खिशातील रोकड, मोबाइल चोरले. याप्रकरणी संबंधित पत्रकार आणि स्वीय सहायकाच्या मदतनिसाने कोपरी ठाण्यात तक्रार केली होती. या प्रकरणाचा समांतर तपास ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेकडून सुरू होता. 


खबऱ्यांच्या नेटवर्कमधून लागला सुगावा

पोलीस पथकाने यात्रेत काढलेले मोबाइल चित्रीकरण तपासून संशयितांची छायाचित्रे गोळा करून ती खबऱ्यांना पाठविली. त्यावेळी छायाचित्रातील चाैघेजण हे मालेगावमधील रहिवासी असून ते सराईत गुन्हेगार असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पथकाने चोरट्यांचे मोबाइल क्रमांक मिळवून लोकेशन तपासले असता ते शीळफाटा येथील एका हॉटेलमध्ये दाखवत होते. त्यानंतर पोलिसांनी त्या हॉटेलमधून चाैघांना ताब्यात घेतले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area