कर्जाचे आमीष दाखवत अडीच लाखांना युवकाला 'चूना'

 

नाशिक : वैयक्तिक कर्जपुरवठा करणाऱ्या एका नामांकित कंपनीच्या नावाचा गैरवापर करत त्या कंपनीचा स्वत:ला अधिकारी भासवून कर्ज मंजुर करण्याचे आमीष दाखवत तोतया अधिकाऱ्याने एका युवकाला सुमारे अडीच लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात चोरट्याविरुध्द फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरात मागील काही दिवसांपासून कर्जप्रकरणांच्या मंजुरीचे आमीष दाखवून चोरट्यांकडून अनेकांना गंडा घातला जात आहे. हे भामटे कर्जपुरवठा करणाऱ्या बजाज फायनान्ससारख्या कंपनीच्या नावाचा वापर करत असल्याचे या घटनेतून पुन्हा समोर आले. काही दिवसांपुर्वीच आर्टीलरी सेंटरमधील एका जवानाला अशाचप्रकारे सुमारे दीड लाख रुपयांना गंडा घातल्याचे उघडकीस आले होते.


फिर्यादी ब्रिजेश परशुराम सिंग (२६, रा. टाकळीरोड) यांना १९ ते २३ जुलै दरम्यान संपर्क साधून त्याने बजाज फायनान्सद्वारे वैयक्तीक कर्ज देण्याचे आमीष दाखवले. सिंग यांचा विश्वास संपादन करण्यासाठी भामट्याने त्यांना बनावट कागदपत्रे सोशलमिडियाद्वारे पाठवली. तसेच कर्ज घेण्यासाठी वेगवेगळे शुल्क द्यावे लागेल असे सांगून भामट्याने वेळोवेळी त्यांच्याकडून २ लाख ३७ हजार ८४४ रुपयांना गंडा घातल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.


मोठी रक्कम वसूल केल्यानंतरसुध्दा कर्जप्रकरण मंजुर झाले नाही आणि बँकेच्या खात्यामध्ये कुठल्याहीप्रकारची रक्कम येण्याऐवजी असलेली रक्कमही गेल्याची जेव्हा खात्री पटली तेव्हा सिंग यांनी सायबर पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी त्यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात संशयित चोरट्याविरुध्द फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area