एकमेकांकडे पाहून खुन्नस दिल्याचा राग, नागपुरातील गोळीबार प्रकरणात दोघांना अटक

 

नागपूर : नागपुरातील गीतांजली टॉकीज चौकात झालेल्या गोळीबार प्रकरणात दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये मुश्रीक खान आणि कामरान अहमद या दोघांचा समावेश आहे. अन्य तीन आरोपींची नावं देखील तपासात समोर आली असून लवकरच त्यांना अटक केली जाणार आहे. मोसीन नावाच्या गुंडावर काल पहाटे गोळीबार झाला होता.

काही दिवसांपूर्वी मोसीन आणि आरोपींचा आमना सामना झाला. तेव्हा एकमेकांकडे बघून खुन्नस दिल्याने संतापलेल्या आरोपींनी मोसीनला धडा शिकवण्यासाठी त्याच्यावर गोळीबार केल्याचं समोर आलं आहे.

नेमकं काय घडलं?

सोमवारी पहाटे चार वाजताच्या सुमारास एका व्हॅनमधून हे आरोपी आले होते. पाठलाग करत आरोपींनी मोसीन खान याच्यावर दोन गोळ्या झाडल्या होत्या. यातील एक गोळी मोसीनच्या मांडीवर लागली होती. तो जखमी झाल्याने त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेनंतर शहरात खळबळ उडाली होती. पोलिसांचा धाक राहिलाय का? असा प्रश्न विचारला जात होता.

पूर्ववैमनस्यातून गोळीबार

आरोपी आणि फिर्यादी यांच्यात जुनं वैमनस्य आहे. 2020 मध्ये मोसीन खान यांनी आरोपींच्या विरोधात कलम 307 अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. 2015 मध्ये सुद्धा दोन्ही गटात मारामारी झाली होती. या वादाचा वचपा काढण्यासाठी आरोपी मुश्रीक खान आणि कामरान अहमद यांनी मोसीनवर गोळीबार केल्याचा आरोप आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area