अश्लील वर्तनाचा तिटकारा, नागपुरात तरुणाकडून मित्राची हत्या

 नागपूर : गॅरेजमधील सहकारी मित्राच्या अश्लील वर्तनाला कंटाळून युवकाने त्याची हत्या केल्याची घटना नागपुरात उघडकीस आली आहे. डोक्यावर टॉमीने वार करुन तरुणाचा खून करण्यात आला. राजू नागेश्‍वर असे मृताचे नाव आहे. तर देवांश वाघाडे असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

बालाघाट येथे राहणारा राजू नागेश्‍वर हा कामाच्या निमित्ताने काही महिन्यांपूर्वी नागपुरात आला होता. आधी तो बांधकाम साईटवर काम करायचा. एका महिन्यापूर्वी तो दाभा ते गणेशनगर मार्गावर असलेल्या आशिष दुर्गे यांच्या गॅरेजमध्ये कामाला लागला. आरोपी देवांश वाघाडे हासुद्धा त्याच्यासोबत गॅरेजमध्येच काम करायचा. दोघेही गॅरेजमध्ये एकाच खोलीत राहायचे.

राजूकडून वारंवार देवांशशी अश्लील वर्तन

राजू हा व्यसनाधीन होता. सोबतच त्याला मुलांसोबत अश्लील कृत्य करण्याचीही सवय होते. देवांश आणि राजू एकाच खोलीत राहत असल्याने तो देवांशची नेहमीच छेड काढण्याचा प्रयत्न करायचा. देवांशला राजूचे अश्लील वर्तन असह्य होत असल्याने तो वारंवार त्याला समजवायचा. मात्र राजूला तरुण मुलांसोबत अश्लाघ्य कृत्य करण्याचे व्यसन लागल्याने तो तरीही त्याला छेडण्याचा प्रयत्न करायचा.

त्या रात्री काय घडलं

घटनेच्या रात्री काम झाल्यावर देवांश झोपला होता. तेव्हा राजूने पुन्हा त्याच्याशी अश्लील चाळे करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे देवांशला चांगलाच राग आला. त्या दोघांमध्ये जोरदार भांडण झाले. भांडणानंतर राजू तिथेच झोपला. पण, त्याच्या अश्लील कृत्यामुळे धास्तावलेल्या देवांशला मात्र झोप आली नाही.

रागाच्या भरात त्याने लोखंडी टॉमीने राजूच्या डोक्यावर वार करुन त्याला एका फटक्यातच ठार केले. त्यानंतर त्याने राजूचा मृतदेह गॅरेजच्या मागील मैदानात फेकून दिला. खोलीत पडलेले रक्तही त्याने स्वच्छ केले आणि काही न झाल्याचे भासवून तो झोपला.

रविवारी सकाळी गॅरेजचा मालक गॅरेजमध्ये आला असता त्याला राजू दिसला नाही. त्याने देवांशला राजूबद्दल विचारले असता, तो रात्री परत आलाच नसल्याचे त्याने सांगितले. आधीच व्यसनाधीन असलेल्या राजूबद्दल आशिषनेही फारशी चौकशी केली नाही.

मैदानात मृतदेह आढळला

परिसरातील नागरिकांना मैदानात मृतदेह पडलेला दिसल्याने त्यांनी गिट्टीखदान पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला. पोलिसांचा ताफा पाहून मालक आशिष दुर्गेही तिथे गेला. त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे गिट्टीखदान पोलिस आशिषच्या गॅरेजमध्ये असलेल्या खोलीत आले. तिथे त्यांना रक्त साफ केल्याचे डाग दिसले. ते पाहून पोलिसांनी देवांशची कसून चौकशी केली असता त्याने घडलेली हकीकत सांगून गुन्ह्याची कबुली दिली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area