चार दिवसांपूर्वी विवाह, साताऱ्यातील तरुणाचा पाण्याच्या टाकीवरुन आत्महत्येचा प्रयत्न

 

सातारा : सातारा जिल्ह्यात आत्महत्येच्या प्रयत्नाचा थरार पाहायला मिळाला. विशेष म्हणजे अवघ्या चार दिवसांपूर्वी विवाहबंधनात अडकलेल्या तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. पाण्याच्या टाकीवर चढून ‘शोले स्टाईल’ आंदोलन करत तरुणाने जीव देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र सुदैवाने त्याचा जीव वाचवण्यात पोलिसांना यश आलं.

काय आहे प्रकरण?

सातारा नगरपालिकेच्या समोर असलेल्या पाण्याच्या टाकीवर चढून एका तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी समोर आला. गुरुवार पेठ भागात राहणाऱ्या या तरुणाने अक्षरशः शोले स्टाईल थरार केला. पोलिसांच्या सतर्कतेमुळे त्याला वेळीच सुखरुप खाली उतरवण्यात यश आले आहे.

नवविवाहित तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

अवघ्या चार दिवसांपूर्वी या तरुणाचे लग्न झाले आहे. मात्र कौटुंबिक वादामुळे मानसिक ताण निर्माण होऊन तो पाण्याच्या टाकीवर चढला आणि त्यातून त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, अशी प्राथमिक माहिती मिळत आहे.

परिसरात बघ्यांची गर्दी

दरम्यान, तरुण थेट पाण्याच्या टाकीवर चढून आत्महत्येचा प्रयत्न करत असल्याची बातमी वाऱ्यासारखी गावात पसरली. या घटनेची माहिती मिळताच परिसरात बघ्यांची मोठी गर्दी जमा झाली होती. पोलिसांनी तरुणाला समजावून त्याला खाली उतरवले. त्याचे व्यवस्थित समुपदेशन करुन त्याला नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक परशुराम कोकरे यांनी दिली आहे. तरुण सुखरुप असल्यामुळे सगळ्यांनीच सुटकेचा निश्वास टाकला.

दारुसाठी ‘हाय व्होल्टेज’ ड्रामा, मद्यपी 80 फूट उंच टॉवरवर

दुसरीकडे, दारुसाठी झालेला ‘हाय व्होल्टेज’ ड्रामा नुकताच साताऱ्यात पाहायला मिळाला होता. नातेवाईक दारु देत नाहीत, म्हणून मद्यपी विजेच्या मुख्य टॉवरवर चढल्याचा धक्कादायक प्रकार पाहायला मिळाला होता. त्याच्या सुटकेसाठी विद्युत प्रवाह बंद करुन बचाव मोहीम हाती घ्यावी लागली होती. कोयनानगर येथील दास्तान गावात घडलेल्या घटनेचा व्हिडीओ समोर आला.

मद्यपी बेळगाव आथणी येथील रहिवासी होता. त्याचे दारुचे व्यसन सोडवण्यासाठी नातेवाईकांनी त्याला कोयनानगर येथील व्यसनमुक्ती केंद्रात आणले होते. मात्र दारु प्यायची असल्याचा हट्ट करत तो चक्क वीज वाहिनीच्या हाय व्होल्टेज टॉवरवरच चढला आणि जवळपास 11 तास धिंगाणा घातला.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area