भावांनो, लय भारी काम केलं; महापुरातून ३०० हून जास्त विषारी, बिनविषारी सापांना वाचवलं!

 कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात जुलै महिन्याच्या अखेरीस आलेल्या महापुरामुळे अनेकांना फटका बसला. यामुळे मानवी जीवन जसे विस्कळीत झाले होते, तसेच वन्यप्राणी, पशुपक्षी यांचे जीवनही विस्कळीत झाले होते. यामध्ये सुरक्षित निवाऱ्यासाठी आलेल्या सर्पराजांचाही समावेश होता. अनेकदा या सापांना ठार मारले जाई; परंतु यावेळी अनेकांनी सर्पमित्रांना बोलावून घेतल्यामुळे या महापुरात सुमारे तीनशेहून अधिक सर्प वाचविण्यात आले.

कोल्हापुरातील वाइल्ड लाइफ प्रोटेक्शन अँड रिसर्च सोसायटी ही संस्था साप, पशू, पक्षी, प्राण्यांना वाचवून मानवी वस्तीपासून दूर त्यांना नैसर्गिक अधिवासात सोडते. या महापुरात संस्थेतील सर्पमित्रांचे एक पथक कार्यरत होते.


या काळात त्यांनी तीनशेहून अधिक विषारी, बिनविषारी आणि निमविषारी सापांना महापुरातून वाचवून त्यांना सुरक्षित अधिवासात सोडले. यात एका घोरपडीलाही सुरक्षित अधिवासात पोहाेचविले. हे सर्व सर्प रंकाळा परिसर, पानारी मळा, अनुकामिनी कॉलनी, दुधाळी, उत्तरेश्वर पेठ, संध्यामठ, राजारामपुरी, लक्षतीर्थ वसाहत, साने गुरुजीनगर, फुलेवाडी या भागात आढळले होते. धोकादायक परिस्थितीत या सर्पमित्रांनी कंबरेएवढ्या पाण्यात जाऊन घरामध्ये निवाऱ्यासाठी आलेल्या सापांना जीवदान दिले.


हे आहेत सर्पमित्र : सागर संकपाळ, अजिंक्य शिद्रूक, संदीप तोडकर, फिरोज झारी, सोहेब बोबडे, गणेश कदम, श्वेता सुतार, स्नेहा जाधव.


यांना वाचविले : आठ नाग, पाच घोणस, तीन मण्यार, १४ नानेटी, १२ दिवड, ११ तस्कर, दोन कुकरी, हरणटोळ, मांजऱ्या.


गगनबावडा, राधानगरीतूनही आले साप

या महापुराच्या काळात कोल्हापूर शहरात सहसा न आढळणारे सापही आढळले. यामध्ये गगनबावडा, राधानगरी, कळे, बाजार भोगाव या परिसरातील सापांचाही समावेश होता. यातील काही सापांनी लाकूड साहित्याची वाहतूक करणाऱ्या ट्रकमधून आले असावेत.


सर्प हे मित्र आहेत. मारण्याऐवजी त्यांना नैसर्गिक अधिवासात सोडण्यासाठी सर्पमित्रांना फोन करून बोलावण्याबाबत कोल्हापुरात चांगली जनजागृती झाली आहे. महापुरात याचा अनुभव आला. धन्यवाद, कोल्हापूरकर.

- गणेश कदम, सर्पमित्र,


वाइल्ड लाइफ प्रोटेक्शन अँड रिसर्च सोसायटी, कोल्हापूर.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area