धक्कादायक! पत्नीला घरी बोलावण्यासाठी मुलीला फासावर लटकवलं; अन् मग...

मुंबई : पत्नी माहेरी निघून गेली आणि वारंवार विनवण्या करूनदेखील घरी परतत नसल्याने पतीने स्वत:च्या मुलीला फासावर लटकवले. मालाडच्या कुरार परिसरात रविवारी हा धक्कादायक प्रकार घडला असून याप्रकरणी पोलिसांनी अजय गौड याला अटक करत दोन मुलांची त्याच्यापासून सुटका केली.


गौड याला नशेचे व्यसन आहे. त्यातच तो पत्नी आणि दोन मुलांना बेदम मारहाण करायचा. ज्याला कंटाळून ती दोन वर्षांपूर्वी दोन्ही मुलांना घेऊन उत्तर प्रदेश येथील गावी निघून गेली. मात्र, गौड काही दिवसांपूर्वी तेरा वर्षांची मुलगी आणि आठ वर्षांच्या मुलाला घेऊन मुंबईत परतला होता. त्यानंतर  नशेत पुन्हा त्याने मुलांना मारहाण करण्यास सुरुवात केली. गौड याचा भाऊ सूचित याने कुरार पोलिसांना तक्रार दिली होती. ज्यात अजयने त्याच्या तेरा वर्षांच्या मुलीला प्लास्टिकच्या बादलीवर उभे करत तिच्या गळ्यात ओढणीने फास टाकत पंख्याला लटकवून जिवे मारण्याचा प्रयत्न केला, असे सांगितले. सूत्रांच्या म्हणण्यानुसार, मुलीला तो पाया खालील बादली हटविण्यास सांगत होता. ज्याला तिने नकार दिल्यावर त्याने पंखा सुरू करण्याची धमकी दिली आणि मुलगी घाबरून ओरडू लागली. तिचा आवाज ऐकून शेजाऱ्यांनी घरी धाव घेत अजयला अडविले.


कुरार पोलिसांनी अजय गौड  याच्या ताब्यातून दोन मुलांची सुटका केली आणि अजयला अटक केली, अशी माहिती कुरार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश बेले यांनी दिली. अजय गौड याने मुलालाही जमिनीवर झोपवून त्याच्या अंगावर सफेद चादर टाकत दोन्ही मुलांचे फोटो काढले व पत्नीला पाठवले. मुलगा मेला आणि मुलगी गळफास घेतेय लवकर मुंबईत परत ये, अशी धमकी त्याने पत्नीला दिली. 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area