रिंगरोड ढाब्यावर तरुणाची हत्या

 

अमरावती : ढाबा बंद असताना भोजनाचा आग्रह धरणाऱ्या दोन आरोपींनी २४ वर्षीय तरुणाची चाकूने भोसकून हत्या केली.  रिंग रोडवरील एका ढाबा परिसरात २३ जुलै रोजी रात्री ११ च्या सुमारास ही घटना घडली. प्रसाद विनोद देशमुख (२४, रा. पंजाबराव देशमुख कॉलनी, व्हीएमव्ही रोड) असे मृताचे नाव आहे. या घटनेत समीर रत्नाकर देशमुख (५०, रा. विद्युतनगर) व दीपक आठवले (२८, रा. महाजनपुरा) हे जखमी झाले. 

याप्रकरणी २४ जुलै रोजी आरोपी सिद्धांत गुलाबराव वानखडे (२३) व संकेत गोवर्धन वानखडे (२२, दोघेही रा. शेगाव, अमरावती) यांना अटक करण्यात आली.  त्यांना २७ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. समीर देशमुख यांनी याबाबत तक्रार नोंदविली. त्यानुसार, समीर व प्रसाद हे कठोरा रिंग रोडवरील एका ढाब्यावर शुक्रवारी रात्री जेवण करण्यास गेले. मात्र, ढाबा बंद असल्याने या दोघांनी संचालक शेखर बिरे यांना हॉटेलवर बोलावून घेतले. बिरे आल्यानंतर त्यांच्याशी बोलत असताना दोन अनोळखी इसम हॉटेलमध्ये आले व त्यांनी बिरे यांना जेवण मागितले. हॉटेल बंद असल्याने जेवण देता येणार नाही, असे म्हटल्याने त्या दोघांनी बिरे यांच्याशी वाद घातला. प्रसाद देशमुख व हॉटेलमधील वेटर दीपक आठवले हे वाद सोडविण्याकरिता गेले असता, दोनपैकी एका आरोपीने प्रसादच्या डाव्या मांडीवर चाकूने वार केला.  त्यातसमीर देशमुख व आठवलेदेखील जखमी झाले.  घटनेनंतर हल्लेखोरांनी तेथून पळ काढला. जखमींना रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान रात्री प्रसादचा मृत्यू झाला. पोलीस आयुक्त आरती सिंह यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर शहरात रात्री १० ते ११ वाजेपर्यंत ढाबे सुरू राहतात अन् तेथे भोजन दिले जाते कसे, हा प्रश्न उपस्थित झाला आहे.


ठाणेदार मुख्यालयात

ढाबा परिसरात उशिरा जेवणाच्या वादातून खून झाल्याने नांदगाव पेठचे ठाणेदार अनिल कुरळकर यांना तडकाफडकी मुख्यालयाशी संलग्न केले, तर बिट इंचार्ज सहायक पोलीस उपनिरीक्षक मोहन चाैखट यांना निलंबित करण्यात आले. पोलीस आयुक्त आरती सिंह यांनी शनिवारी ही कारवाई केली. ठाणेदारपदाचा प्रभार गोरखनाथ गांगुर्डे यांना दिला आहे. 


ढाबा परिसरात झालेल्या हत्येप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली. ठाणेदारांना नियंत्रण कक्षाशी संलग्न करण्यात आले. बिट इंचार्ज असलेल्या एएसआयला निलंबित करण्यात आले. 

- आरती सिंह, पोलीस आयुक्त

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area