'त्या' ५८ मुलींचा लागेना थांगपत्ता...

 

नाशिक: प्रेम प्रकरण, करिअर अथवा कौटुंबिक कलह यामुळे घर सोडून जाणाऱ्या अल्पवयीन मुलांची संख्या वाढत आहे. विशेषत: प्रेम प्रकरणामुळे घर सोडून जाणाऱ्या युवतींचे प्रमाण लक्षणीय आहे. २०१८ ते ३१ मे २०२१ या कालवधीत शहरातून अशा पद्धतीने ६२३ मुली बेपत्ता झाल्या. त्यापैकी ५६५ मुलींचा शोध घेऊन त्यांना कुटुंबीयांकडेना सुपूर्द करण्यात पोलिसांना यश मिळाले. मात्र, आजही त्यातील ५८ मुली बेपत्ताच आहेत.


मागील काही वर्षांपासून अल्पवयीन मुलांनी घर सोडण्याचे प्रमाण वाढले आहे. विशेषत: प्रेम प्रकरणांमध्ये १८ वर्षापर्यंतच्या मुली घराबाहेर पडतात. या प्रकरणात थेट अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात येतो. त्यामुळे तिच्यासोबत असलेल्या १८ ते २१ या वयोगटातील मुलांना पुढे 'पोस्को'सारख्या गंभीर गुन्ह्यांना समोरे जावे लागते. पोलिसांच्या दाव्यानुसार राज्यात मानवी तस्करीचे प्रमाण खूपच कमी असून, शहरात ते शून्यच आहे. त्यामुळे अल्पवयीन मुलींच्या बेपत्ता होण्यामागे प्रेम प्रकरण, करिअर, नवीन काहीतरी करण्याची इच्छा वा कौटुंबिक कलह ही कारणे असतात. त्यानुसार पोलिस शोध घेतात. अनेकदा कुटुंबीय परत आणतील या भीतीने या मुली अगदी परराज्यांपर्यंत पोहोचतात. मात्र, अपहरणाचा गुन्हा दाखल झालेला असल्याने आम्ही या मुलींना परत आणतो. याच वर्षात ३१ मेपर्यंत ७९ अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्या होत्या. त्यातील ५२ मुलींचा शोध लावण्यात आला. २७ मुलींचा शोध घेणे अद्याप बाकी आहे. शहरात २०१२ पासून अल्पवयीन मुली घर सोडून जाण्याच्या प्रमाणात लक्षणीय वाढ होत आहे. अगदी २०२० या लॉकडाउनचा सामना करावा लागलेल्या वर्षात १६३ मुली बेपत्ता झाल्या होत्या. मोबाइलचा बेबंद वापर, टीव्ही मालिका, तसेच सिनेमांमध्ये दाखविण्यात येणारे प्रेमाचे उथळ चित्रण, पालकांकडून मिळणारी वागणूक अशा अनेक बाबींचा हा परिणाम असल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले.

गत तीन वर्षांतील स्थिती...

वर्ष - बेपत्ता अल्पवयीन मुली- सापडलेल्या - अद्याप बेपत्ता

२०१८ - १८२- १७२- १०

२०१९ - १९९- १९३- ६

२०२० - १६३- १४८- २७

२०२१- ७९- ५२- २७

एकूण- ६२३- ५६५- ५८

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area