पुण्यात गुटखाविक्रत्यांची पुन्हा झाडाझडती; शहरात ३० ठिकणी छापे

 

पुणे शहर पोलिसांनी वर्षाभरानंतर गुटखाविक्री करणाऱ्या व्यावसायिकांच्या विरोधात शनिवारी पहाटेपासून जोरदार मोहीम राबवली. येरवडा, विमानतळ, चंदननगरसह शहराच्या विविध भागातील पान टपरी, किराणा दुकानदार यांच्यावर ३० ठिकाणी छापे टाकून ३९ लाख रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. या प्रकरणी २९ जणांवर गुन्हा दाखल करून पाच खटले भरण्यात आले आहेत.पोलिसांनी गेल्या वर्षी कनार्टक, दीव-दमण या ठिकाणी छापे घालून गुटखा उत्पादकांच्या मुसक्या आवळण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, या कारवाईनंतर अचानक पुणे पोलिसांची गुटखाविक्री विरोधातील कारवाई थंडावली होती. त्याच वेळी मुंबईमध्ये गुटख्यातून होणारी हप्तेवसुली अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) रडारवर आल्यानंतर पुण्यात गेल्या वर्षापासून गुटखाविक्रीबाबत कोणतीही कारवाई झाली नव्हती. त्यानंतर वर्षभरानंतरच अचानक स्थानिक पोलिसांनी पानटपरी तसेच किराणा व्यावसायिकांवर गुटखा विक्रीप्रकरणी कारवाई केली.

शहरातील टपऱ्या आणि किराणा मालाच्या दुकानामध्ये गुटखाविक्री होत असून, मोठा साठा करून ठेवला असल्याची माहिती पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना मिळाली होती. त्यानुसार आयुक्तांनी गुटखाविक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले. त्यानुसार झोन चारचे पोलिस उपायुक्त पंकज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहा पोलिस निरीक्षक, सहा सहायक निरीक्षक, २३ उपनिरीक्षक, ६० कर्मचारी यांची पाच पथके तयार करण्यात आली. त्यानुसार येरवडा, विमानतळ आणि अन्य भागांत टपरी आणि किराणा दुकानांवर तीस छापे टाकण्यात आले. त्या वेळी त्या ठिकाणी प्रतिबंधित गुटखाविक्री केला जात असल्याचे आढळून आले. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करून ३९ लाखांचा गुटखा जप्त केला आहे. याप्रकरणी संबंधित स्थानिक पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

'त्या' अधिकाऱ्याचा पदभार काढला

गुटखाविक्रीचे रॅकेट उघडकीला आणून थेट गुटख्याच्या कारखान्यापर्यंत पोहोचणाऱ्या पोलिसांच्या कारवाया अचानक थंड झाल्या होत्या. या कारवायांदरम्यान कथित गैरप्रकार झाल्याच्याही तक्रारी वाढल्या होत्या. पोलिस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांच्या आदेशान्वये या प्रकरणी खातेनिहाय चौकशीही सुरू करण्यात आली होती. पुणे पोलिसांकडून गेल्या वर्षी करण्यात आलेल्या कारवायांमुळे दिल्ली, दीव-दमण तसेच कर्नाटकमध्येही खळबळ उडाली होती. या संदर्भात नुकताच या अधिकाऱ्याकडील पदभार काढण्यात आला असून, त्यांना प्रशासकीय जबाबदारी देण्यात आल्यामुळे आयुक्तालयात खमंग चर्चा सुरू झाली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area