पुणे : एजन्सी देण्याच्या आमिषाने फसवणूक; भामट्यांनी घातला सहा लाखांना गंडा

 

पुणे: पतंजली कंपनीचा मुख्य कार्यकारी अधिकारी बोलत असल्याची बतावणी करून सायबर चोरट्याने दोघा भावांना एजन्सी देण्याच्या नावाखाली पाच लाख ७० हजारांचा ऑनलाइन गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी चतुःशृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत राघवेंद्र जगन्नाथ कुलकर्णी (वय ४६, रा. बाणेर) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात आरोपींच्या विरोधात आयटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार आणि त्यांच्या भावाला पतंजली कंपनीची एजन्सी घ्यायची होती. त्यासाठी त्यांनी ऑनलाइन नोंदणी केली होती. त्यानुसार २४ ऑक्टोबर २०२०ला चोरट्याने तक्रारदार यांना फोन करून पतंजली कंपनीचा मुख्य कार्यकारी अधिकारी बोलत असल्याचे सांगितले. तुम्हाला एजन्सी सुरू करायची असल्यास एक लाख २० हजार रुपये जमा करा, असे त्याने सांगितले. विश्वास संपादित करण्यासाठी सायबर चोरट्याने तक्रारदारांच्या व्हॉट्सअॅप क्रमांकावर पतंजलीचे प्रमाणपत्र पाठविले. त्यानंतर विश्वास पटल्यानंतर तक्रारदार आणि त्यांच्या भावाने वेळोवेळी संबंधिताच्या बँक खात्यात ऑनलाइन पाच लाख ७० हजार रुपये जमा केले. मात्र, त्यानंतरही पतंजली कंपनीची एजन्सी न मिळाल्यामुळे फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.

    Post a Comment

    0 Comments
    * Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

    Ads Area