पोलिसांचा पहारा, पर्यटकांचा गुंगारा

 

त्र्यंबकेश्वर: पर्यटकांचे आवडीचे ठिकाण असलेल्या पहिने घाट परिसरात रविवारी मैत्री दिनानिमित्त तरुणांची गर्दी उसळली. मात्र घाटात जागोजागी पोलिसांचा खडा पहारा असल्याने या पर्यटकांची पंचाईत झाली. पोलिसांचा ससेमीरा टाळण्यासाठी काहींनी माघारी जाणे पसंत केले तर काहींनी आडमार्गाने घाट गाठत पर्यटनाची हौस पूर्ण केली. अंबोली परिसरातील रिसॉर्टच्या रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. तोरंगण घाटातही दिवसभर अशीच परिस्थिती होती.


गेल्या आठवड्यात गंगाद्वार आणि ब्रह्मगिरी येथे दगड कोसळल्याने या रविवारी दोन्ही ठिकाणी जाणारे मार्ग बंद करण्यात आले होते. पोलिसांचा या मार्गावर पहारा असल्याने पर्यटकांनी इतर डोंगर-टेकड्या पार करीत पर्यटनाची हौस पूर्ण केली. पोलिस निरीक्षक संदीप रणदिवे, सहायक निरीक्षक शिवचरण मांढरे, उपनिरीक्षक अश्विनी टिळे आणि श्रीमती डफळ यांनी पहिने, दुगारवाडी या रस्त्यांची नाकाबंदी केली. तसेच ब्रह्मगिरीसह अन्य ठिकाणी जाण्यास पर्यटकांना मज्जाव करण्यात आला होता. त्र्यंबकेश्वर शहरातही रविवारी गर्दी झाली होती. अजूनही विकएण्ड लॉकडाउन असल्याने शहरात व्यवसाय बंद होते. मात्र मंदिरासमोरच्या रस्त्यावर शंख-माळांचा बाजार भरला होता. वाहनांची देखील दाटी झाली होती.

...म्हणून रविवारी गर्दी


पुढच्या रविवारी गटारी अमावस्या आहे. त्यामुळे या परिसरातील रिसॉर्ट, हॉटेल, धाबे आणि खानावळीवर गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढच्या रविवारी गर्दी करण्यापेक्षा नाशिक आणि परिसरातील काही पर्यटकांनी या रविवारीची संधी साधली. अंबोली वेळुंजे रस्त्यावर असलेले हॉटेल, रिसॉर्ट येथे प्रचंड गर्दी उसळली होती.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area