श्रीमंत तरुणीच्या अपहरणानंतर अख्खी पोलीस यंत्रणा लागली कामाला; तपासातून समोर आला धक्कादायक प्रकार

 

नागपूर : २० लाख रुपयांच्या खंडणीसाठी एका तरुणीचे अपहरण करण्यात आल्याची चर्चा भल्या सकाळी शहरात वायूवेगाने पसरली. त्यामुळे शहरभर खळबळ उडाली. पोलिसांनी वेगवेगळी पथके तयार करून दोन तासातच या कथित अपहरणनाट्याचा शेवट केला. तरुणी सुखरूप असून पोलिसांनी तिच्या मित्रासह दोघांना ताब्यात घेतले आहे.

इमामवाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका धनिक परिवारातील १९ वर्षीय तरुणी शुक्रवारी भल्या सकाळी घरून बेपत्ता झाली. तिच्या मोबाईल वरून सकाळी ७ च्या सुमारास तिच्या वडिलांच्या मोबाईलवर फोन आला. तरुणीचे अपहरण करण्यात आले असून तिच्या सुटकेसाठी २० लाख रुपये खंडणी द्यावी लागेल, असे पलीकडून बोलणार यांनी सांगितले. पुढच्या अर्ध्या तासात खंडणीसाठी आणखी पाच ते सात फोन कॉल्स तरुणीच्या वडिलांना आले. त्यामुळे वडिलांनी पोलिसांशी संपर्क साधला.  तरुण मुलीचे अपहरण झाले असून अपहरणकर्ता वीस लाखांची खंडणी मागत असल्याचे  त्यांनी पोलिसांना सांगितले. इमामवाडा पोलिसांनी ही माहिती वरिष्ठांना दिली. त्याची तात्काळ दखल घेत पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी लगेच संपूर्ण शहर पोलीस यंत्रणा तपासासाठी कामी लावली. सायबर शाखेचे एक स्वतंत्र पथक मुलीचे कॉल लोकेशन शोधू लागले. सक्करदऱ्यातील महाकाळकर सभागृहाजवळ लोकेशन ट्रेस झाले. त्यामुळे या भागातील ७० ते ८० पोलिस तरुणीचा शोध घेऊ लागले. 


मोठा पोलीस ताफा आजूबाजूला दिसल्यामुळे कथित अपहरणकर्ते घाबरले. तरुणीने पुन्हा तिच्या वडिलांना फोन करून आपण सुखरूप असल्याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी तिला तसेच तिच्या एका मित्रासह दोघांना सकाळी ९.३० ला ताब्यात घेतले. या प्रकरणात तिघांकडूनही विसंगत माहिती येत असल्यामुळे दुपारी दीड वाजेपर्यंत या कथित अपहरण प्रकरणातील वास्तव उजेडात आले नव्हते.


३० लाखांची बीएमडब्ल्यू


या प्रकरणात पोलिस अधिकाऱ्यांकडून नेमकी माहिती देण्यासाठी टाळाटाळ केली जात होती. त्यामुळे उलट-सुलट चर्चेत आणखीच भर पडली होती. या कथित अपहरण प्रकरणात तरुणीचाही सहभाग असल्याची चर्चा होती.  तरुणी आर्थिक दृष्ट्या संपन्न असल्यामुळे ती तिच्या मित्राला नेहमीच मोठी रक्कम देत होती. कोणतेही कामधंदे न करणाऱ्या या तरुणाजवळ ३० लाखांची बीएमडब्ल्यू असून तरुणीनेच त्याला ती घेऊन दिल्याचीही  माहिती चंदननगर भागातील नागरिक देत होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area