डांबरीकरण केलेल्या रस्त्यावर अवघ्या 12 तासात खड्डे; चार अभियंत्यांच्या निलंबनानंतरही ठाणे पालिकेचा भोंगळ कारभार सुरूच

 


ठाणे: रस्त्यावर खड्ड्यांचं साम्राज्य निर्माण झाल्याने ठाणे पालिकेचे चार अभियंते निलंबित करण्यात आले आहेत. या अधिकाऱ्यांचं निलंबन करून चार दिवस होत नाही तोच पुन्हा एकदा पालिकेचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. पालिकेने डांबरीकरण केलेल्या रस्त्यावर अवघ्या 12 तासात खड्डे पडल्याचा दावा पालिकेतील विरोधी पक्षनेते अश्रफ शानू पठाण यांनी केला आहे. तसेच डांबरीकरण केलेल्या रस्त्यावर खड्डे पडत असल्याने स्थानिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. (ashraf shanu pathan slams thane corporation over potholes)

डांबरीकरण केल्यानंतर अवघ्या 12 तासातच रस्त्यांमध्ये खड्डे पडल्याचा प्रकार मुंब्रा येथे घडला आहे. त्याचा निषेध करण्यासाठी विरोधी पक्षनेते अश्रफ शानू पठाण यांनी रस्त्यावर उतरुन ठेकेदारांच्या या प्रतापाची पोलखोल केली. दरम्यान, ठाणेकर रस्त्यातील खड्ड्यांमुळे त्रस्त असतानाही ठामपा आयुक्त ठोस कारवाई करीत नसल्याने ठेकेदार मस्त रहात आहेत, अशी टीका पठाण यांनी केली आहे. ठाणे महानगर पालिका हद्दीतील अंतर्गत रस्त्यांवर सध्या खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. त्यावरुन टीका होऊ लागल्याने रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात येत आहे. मात्र, हे डांबरीकरणही निकृष्ठ दर्जाचे आहे. याची पाहणीही पठाण यांनी केली.

कंत्राटदाराला काळ्या यादीत टाका

मुंब्रा भागातील रस्त्यांचे सोमवारी रात्री डांबरीकरण करण्यात आले होते. मात्र, मंगळवारी सकाळी या रस्त्यांवरील हे डांबर उखडून निघाले असल्याचे दिसून आले. पठाण यांच्यासह दिनेश बने यांनी या रस्त्यांवर टाकण्यात आलेला डांबर हाताने उखडून दाखविले. ठाणेकरांच्या करातून ही कामे केली जात आहेत. मात्र, त्यांच्या या कराच्या पैशांचा ठामपाकडून अपव्यय केला जात आहे. पालकमंत्र्यांच्या दौर्‍यामध्येही डांबरीकरणाचा हा प्रकार उघडकीस आलेला आहे. त्यानंतरही पालिका आयुक्तांकडून ठोस कारवाई केली जात नसल्यानेच ठेकेदार कोणालाही जुमानत नाहीत. स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी ठाणेकरांचा पैसा पाण्यात घालत आहेत. डांबरीकरणाच्या नावाखाली केवळ खडी टाकण्यात येत आहे. कोणत्याही प्रकारचे डांबर, रसायन याचा वापर केला जात नाही. त्यामुळेच अवघ्या 12 तासात रस्ते उखडत आहेत. असे काम करणार्‍या कंत्राटदारांवर कारवाई करुन त्यांना काळ्या यादीत टाकावे, अन्यथा आम्ही या ठेकेदारांना आमच्या पद्धतीने धडा शिकवू, असा इशाराही पठाण यांनी दिला.

चार अभियंते निलंबित

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून ठाण्यातील खड्ड्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या खड्ड्यांचा राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनाही बसला आहे. त्याची दखल खुद्द पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली होती. शिंदे यांनी ठाण्यातील खड्डयांची पाहणी करून अधिकाऱ्यांना फैलावर घेतले होते. त्यानंतर या खड्ड्यांना जबाबदार असलेल्या पालिकेच्या चार अभियंतांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे.

ठाणे महापालिकेने आज ही कारवाई केली. उथळसर प्रभाग समितीतील अभियंता चेतन पटेल, वर्तकनगर प्रभाग समितीतील अभियंता प्रशांत खडतरे, लोकमान्य नगर-वर्तक नगर प्रभाग समितीतील अभियंता संदीप सावंत आणि संदीप गायकवाड यांना निलंबित करण्यात आले आहे. रस्त्यावरील खड्डे कालमर्यादेत बुजविण्यात या अभियंत्यांना अपयश आल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान, पालिकेने अभियंत्यांवर कारवाई केली. मात्र, कंत्राटदारांवर कारवाई कधी करणार असा सवाल या निमित्ताने केली जात आहे. (ashraf shanu pathan slams thane corporation over potholes)

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area