murder of contractor: धक्कादायक! कंत्राटदाराची हत्या; हत्येनंतर सोने, पैसे काढून मृतदेह पुरला

ठाणे:  बेपत्ता झालेले ठाण्यातील कोलशेत येथील पेटींग कंत्राटदार हनुमंत शेळके यांची हत्या करून त्यांच्याकडील पाच ते सात तोळे दागिने तसेच १० हजार रुपये काढून घेत नंतर त्यांचा मृतदेह जमिनीत पुरला असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. गंभीर बाब म्हणजे आरोपींचा आणखीन १५ लाखांची खंडणी उकळण्याचा बेत होता. खंडणीसाठी आरोपींनी या कंत्राटदाराच्या व्यावसायिक भागीदारास फोनही केला होता. या प्रकरणी कापुरबावडी पोलिसांनी दोघांना अटक केले असून तिघे फरारी आहेत. दरम्यान, शेळके यांच्या हत्येनंतर आरोपींनी खंडणी मागण्यासाठी शेळके यांच्याच फोनचा वापर केला होता. आणि हाच धागा पकडून या गुन्ह्याची उकल करण्यास पोलिसांना यश आले. (gold and money were looted by killing the contractor and then the body was buried in the ground in thane)


कोलशेतमधील वरचा गावात राहणारे कंत्राटदार हनुमंत शेळके (४७) १ सप्टेंबर रोजी रात्री ८.३० वाजता कोलशेत नाका येथे एका आजारी कामगारास पैसे देण्यासाठी घरातून बाहेर पडले. मात्र, नंतर ते घरी आलेच नाही. दुसऱ्या दिवशी कापुरबावडी पोलिस ठाण्यात शेळके बेपत्ता झाल्याविषयी तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांचा तपास चालू होता. त्याचदरम्यान शेळके यांचे व्यावसायिक भागीदार तसेच मित्र संतोष पाटील यांना ६ सप्टेंबर रोजी शेळके यांच्याच मोबाईलवरून फोन आला. शेळके यांना सोडून देण्याच्या मोबदल्यात १५ लाखांची खंडणीची मागणी त्यांच्याकडे करण्यात आली होती.

ही माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर शेळके यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके स्थापन करण्यात आली. आणि आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी समोरच्या व्यक्तीसोबत बोलणे सुरु ठेवले. तांत्रिक तपासाच्या आधारे शिवा वर्मा (२४), सुरज वर्मा (२२) या दोघांना अटक केले. शिवा हा नवी मुंबईतील दिघा येथे तर सुरज कल्याणमध्ये राहतो. चौकशीमध्ये त्यांनी हत्येची कबुली दिल्याचे पोलिस उपायुक्त डॉ. विनयकुमार राठोड यांनी सांगितले.

या गुन्ह्यात आणखीन तिघे फरारी असून या आरोपींची ओळख पटलेली आहे. यातील दोन आरोपी हे शेळके यांच्याकडे काम करत होते. त्यामुळे शेळके यांच्याकडे पैसे असल्याची त्यांना माहिती होते. हे दोघे या गुन्ह्यातील मुख्य आरोपी असून फरारी आरोपींना अटक करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरु असल्याचे राठोड यांनी सांगितले. या हत्येमागे पैसे मिळवण्याचा आरोपींचा उद्देश होता असेही पोलिस तपासात समोर आले आहे. कापुरबावडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल देशमुख, पोलिस निरीक्षक संजय निंबाळकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक ए. टी. वाघ, पोलिस उप निरीक्षक एम. जी. काळे यांनी या गुन्ह्याची उकल केली.


१ सप्टेंबरलाच शेळके यांची हत्या

हनुमंत शेळके यांची १ सप्टेंबर रोजीच आरोपींनी हत्या केली होती. त्यांच्याकडील पैसे आणि दागिने काढून घेत नंतर त्यांचा मृतदेह कोलशेत येथील खालचा गावात निर्जन स्थळी जमिनीमध्ये पुरला होता. नंतर पुन्हा एकदा आरोपींचा खंडणी उकळण्याचा डाव होता, ही बाबही चौकशीमध्ये स्पष्ट झाली आहे. पोलिसांनी शेळके यांचा मृतदेह बाहेर काढला असून या गुन्ह्यात हत्येचे कलम वाढवण्यात आले आहे.

व्यावसायिकांचे हत्येचे सत्र सुरूच

काही महिन्यापूर्वी ठाण्यातील व्यावसायिक मनसुख हिरन यांची हत्या झाली होती. या प्रकरणानंतर ठाण्यातीलच सराफ व्यावसायिक भरत जैन यांची गेल्याच महिन्यात हत्या करण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा कंत्राटदार हनुमंत शेळके यांच्या हत्येचे प्रकरण समोर आल्याने खळबळ उडाली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area