IPL 2021: आधी विराटचं-मॅक्सवेलचं अर्धशतकं, मग हर्षल पटेलच्या भेदक माऱ्यासमोर मुंबई गारद, 54 धावांनी दारुण पराभव

IPL 2021: आयपीएलच्या (IPL) 39 व्या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाचा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून (RCB vs MI) दारुण पराभव झाला आहे. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात आरसीबीने मुंबईवर 54 धावांनी दमदार विजय मिळवला. आधी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी धडाकेबाज अर्धशतकं ठोकल्यानंतर गोलंदाजीवेळी हर्षल पटेलने (Harshal Patel) जबरदस्त हॅट्रीक घेत मुंबईची फलंदाजी भेदत सामना आरसीबीच्या खिशात घातला.

सामन्याच्या सुरुवातीला नाणेफेक जिंकत मुंबई इंडियन्सने गोलंदाजी घेतली. पण आरसीबीचे फलंदाज धमाकेदार फलंदाजी करत असल्याने मुंबईला त्यांचा निर्णय़ चुकला असे वाटत होते. पण अखेरच्या षटकात मात्र मुंबईच्या गोलंदाजांनी उत्तम बोलिंग करत आरसीबीला 165 धावांवर रोखलं. त्यानंतर मुंबईचे फलंदाज 166 धावा करुन सामना जिंकण्यासाठी मैदानात उतरले. सुरुवातही दमदार झाली. सलामीवीर कर्णधार रोहित शर्मा आणि क्विंंटन डिकॉक यांनी दमदार सुरुवातकेली. पण 57 धावांवर डिकॉक बाद झाला. ज्यानंतर कर्णधार रोहित एकाकी झुंज देत होता. पण रोहित नॉन स्ट्राईकवर असताना ईशान किशनचा बॉल त्याला लागला. ज्यानंतर पुढच्याच चेंडूवर रोहित बाद झाला. 43 धावा करुन रोहित बाद होताच एकामागोमाग एक फलंदाज बाद होतं गेले. पण अखेरच्या काही षटकात क्रिजवर हार्दीक आणि पोलार्ड हे धाकड खेळाडू होते. ज्यांच्यासाठी सामना जिंकवणं अवघड नव्हतं. पण त्याच क्षणी आरसीबीनं त्यांचा हुकमी एक्का काढला.

हर्षलचा भेदक मारा आणि मुंबई पराभूत

विजयासाठी मुंबईला 60 धावांची गरज असताना आरसीबीचा यंदाच्या हंगामातील मुख्य गोलंदाज हर्षल पटेलने चेंडू हातात घेतला. तो 17 वी ओव्हर टाकत होता. समोर हार्दीकसह पोलार्ड होता. सिक्सर किंग असणारे दोघेही सामना जिंकवण्याची ताकद मनगटात ठेवून होते. पण हर्षलने जबरदस्त अशा स्लो डिलेव्हरीज टाकत आधी हार्दीकला कर्णधार कोहलीच्या हाती झेलबाद केलं. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर पोलार्डची दांडी उडवली. या दोघांच्या जाण्याने मुंबईच्या हातातून सामना जवळपास गेलाच होता. पण तिसऱ्या चेंडूवर हर्षलने राहुल चाहरला पायचीत करत अप्रतिम अशी हॅट्रिक नोंदवली. त्याच्या या हॅट्रिकमुळे आरसीबीला विजय सोपा झाला. हर्षलने विकेट घेताच सर्व संघाने जल्लोष केला.

ग्लेन मॅक्सवेल सामनावीर

हर्षल पटेलने हॅट्रीक घेतली खरी पण सामन्यात बॅट आणि बॉल अशा दोन्हीने अप्रतिम प्रदर्शन करणाऱ्या ग्लेन मॅक्सवेलला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. मॅक्सवेलने फलंदाजीवेळी 37 चेंडूत 56 धावा लगावल्या. ज्यानंतर गोलंदाजीवेळी 4 षटकात 23 धावा देत 2 विकेट्सही घेतल्या.


Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area