Mobile thieves: धक्कादायक! ठाण्यात मोबाईलचोरांनी रिक्षातून खेचून तरुणाला फरफटत नेले

ठाणे शहर पोलिस आयुक्तालय हद्दीत चोरांनी खूपच हौदोस घातला असून रिक्षातून घरी जाणाऱ्या एका तरुणाचा मोबाइल दुचाकीवरील चोरांनी खेचण्याचा प्रयत्न केला. परंतु तरुणाने हातातील मोबाइल न सोडल्याने चोरांनी या तरुणालाच धावत्या रिक्षातून बाहेर खेचल्याचा धक्कादायक प्रकार भिवंडीतील भादवड नाका येथे घडला आहे. रिक्षातून खाली पडलेल्या तरुणाला चोर फरफटत घेऊन गेले. शिवाय तरुणाचा मोबाइलही चोरांनी लांबवला असून या संपूर्ण प्रकारामध्ये तरुणाच्या पाठीला गंभीर दुखापत झाली आहे. (
mobile thieves dragged a youth out of a auto rickshaw in thane)

मोबाइल विक्रीचा व्यवसाय करणारा महेंद्र केसराम कुमार हा २५ वर्षांचा तरुण भिवंडीतील टेमघर परिसरात राहतो. बुधवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास तो रिक्षातून घरी निघाला होता. भादवड नाका येथून जात असताना पाठीमागून दुचाकीवरून आलेल्या दोघांपैकी दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या चोराने महेंद्रच्या हातातील मोबाइल खेचण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने हातातील मोबाइल काही सोडला नाही. त्यामुळे चोराने महेंद्रचा हात पकडून त्याला रिक्षातून बाहेर खेचले. जमिनीवर पडूनही त्याने हातातील मोबाइल न सोडल्याने चोर महेंद्रला जमिनीवरूनच खेचत घेऊन गेल्याने त्याच्या पाठीला जबर दुखापत झाली आहे. अखेर चोर या तरुणाच्या हातातील मोबाइल घेऊन पळून गेले. मोबाइलची किंमत १२ हजार ५०० रुपये आहे.

या प्रकरणी रात्री उशिरा दोन चोरांविरुद्ध शांतीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी २० ते २२ वर्ष वयोगटातील असून शांतीनगर पोलिसांनी तत्काळ आरोपींचा शोध सुरू केला. या प्रकरणात दोघांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडे चौकशी करण्यात येत असल्याची माहिती एका पोलिस अधिकाऱ्याने दिली.

दरम्यान, तीन महिन्यांपूर्वी ठाण्यात रिक्षातून जाणाऱ्या एका तरुणीच्या हातातील चोरट्यांनी मोबाइल खेचल्यानंतर ही तरुणी धावत्या रिक्षातून तोल जाऊन रस्त्यावर पडली. या प्रकारामध्ये गंभीर जखमी झालेल्या या तरुणीचा मृत्यू झाला होता.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area