“कात्रजचा खून झाला” पुण्यात विचित्र होर्डिंग, भारती विद्यापीठ पोलिसात गुन्हा

 


पुणे : पुण्यातील प्रसिद्ध कात्रज चौकाजवळ “कात्रजचा खून झाला” असे विचित्र होर्डिंग लावणाऱ्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सार्वजनिक मालमत्तेचे विद्रुपीकरण केल्याच्या कायद्यानुसार अनोखळी व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.

काय आहे प्रकरण?

या प्रकरणी हनुमंत तुकाराम लोणकर (वय 52 वर्ष, रा. कोंढवा, पुणे) यांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. “कात्रजचा खून झाला” असं मोठ्या अक्षरात लिहिलेल्या आणि रक्ताने माखलेला सुरा असलेल्या या विचित्र होर्डिंगवरुन मंगळवारी दिवसभर पुणे शहरात मोठ्या प्रमाणात चर्चा रंगली होती. तसेच त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरणही पसरले होते.

पोस्टरबाज अज्ञात

विशेष म्हणजे पोलीस चौकीपासून अवघ्या 100 मीटर अंतरावर अशा प्रकारचा प्रक्षोभक बॅनर लावल्यामुळे परिसरात विविध चर्चांना उधाण आले होते. मात्र हा बॅनर नेमका कोणी आणि कधी लावला, ते लिहिण्यामागील कारण काय, हे अजून अस्पष्ट आहे. बॅनरचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

अनधिकृत होर्डिंगचे मोठे जाळे

दरम्यान, कात्रज परिसरात अनधिकृत होर्डिंगचे मोठे जाळे पसरल्याचे दिसत आहे. आकाश चिन्ह विभागाकडून दुर्लक्ष होत असल्याचा सूर स्थानिक रहिवाशांनी लावला आहे. पुणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने हा बॅनर काढला.

पुण्यातील बॅनरबाजी

पुणेरी पाट्या जगभरात प्रसिद्ध आहेत. शहरातील प्रत्येक घरासमोर लावलेल्या विशेष संदेश देणाऱ्या पाट्यांनीही पुण्याला एक ओळख दिली आहे. मात्र गेल्या काही वर्षात त्याच्या एक पाऊल पुढे जात पुण्यात पोस्टर संस्कृतीही रुजताना दिसत आहे. प्रसिद्धीसाठी कोण काय करेल याचा काही नेम नसतो. त्यात विषय पुण्याचा असेल तर मग बोलायलाच नको. याआधीही पुण्यातील नागरिकांनी अनेक नवे ट्रेंड सेट केले आहेत.

जुन्नरमध्ये 125 फुटी बॅनर 

पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात असाच प्रकार पाहायला मिळाला होता. जुन्नरमध्ये आपल्या प्रसिद्धीसाठी एकाने थेट 125 फुटी बॅनर लावला होता. इतकंच नाही, तर आपले किती समर्थक आहेत, याचं प्रदर्शन करण्यासाठी या पठ्ठ्याने शेकडो लोकांच्या फोटोंचा कोलाजच तयार केला होता. त्यामुळे या बॅनरजी जोरदार चर्चा रंगली होती.

‘हॅप्पी अॅनिव्हर्सरी, सॉरी आप्पू’

पुण्यातील हडपसर भागासह अनेक ठिकाणी ‘हॅप्पी अॅनिव्हर्सरी, सॉरी आप्पू’ असं लिहिलेले पोस्टर बघायला मिळाले होते. आपल्या नाराज झालेल्या पत्नीला मनवण्यासाठी एका डॉक्टरने हे फ्लेक्स लावल्याची चर्चा होती. दोघेही पती-पत्नी डॉक्टर असून त्यांचा घटस्फोटाचा दावा न्यायालयात सुरु असल्याने पतीने ही पोस्टरबाजी केल्याची चर्चा होती.

“सविताभाभी, तू इथंच थांब….”

पुण्यातील रस्त्यांवर लागलेले “सविताभाभी, तू इथंच थांब….” असा मजकूर असणारे पोस्टर सोशल मीडियावरही व्हायरल झाले होते. काळ्या रंगाच्या पार्श्वभूमी असलेल्या या पोस्टरवर इतर काहीही लिहिलेले नव्हते. मात्र नंतर हे पोस्टर एका चित्रपटाच्या प्रमोशनसाठी लावल्याचं समोर आलं होतं.

‘शिवडे, आय अॅम सॉरी’

यापूर्वी पुण्यासह पिंपरी-चिंचवड शहरात ‘शिवडे, आय अॅम सॉरी’ या पोस्टरची चर्चा झाली होती. पिंपरीतील ‘स्मार्ट बायका कुठे जातात’ असा असा मजकूर असलेली पोस्टर व्हायरल झाली होती. त्यावेळी संबंधित फ्लेक्स लावणाऱ्या दुकानदाराने टीका झाल्यावर माफीही मागितली होती.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area