नाशिक: नाशिकरोड येथील हॉटेलमध्ये पतीने पत्नीला भेटायला बोलावून गळा दाबून तिचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पतीला नाशिकरोड पोलिसांनी बिटको पॉईंट परिसरातून ताब्यात घेतले आहे. (the husband ended the life of his wife by calling her to the hotel)
कोपरगाव (जि. अहमदनगर) येथील ज्योती पोपट वीर व पती पोपट वीर यांच्यात वाद सुरू होता. त्या कारणावरुन ज्योती या जेलरोड भागातील त्यांच्या माहेरी आलेल्या होत्या. पती पोपट याने पत्नी ज्योतीला मंगळवारी (दि.२८) सायंकाळी बिटको पॉईंट येथील पवन हॉटेलमध्ये भेटण्यासाठी बोलावले होते. या ठिकाणी रुममध्येच पत्नीचा गळा दाबून खून केल्यानंतर पती पोपट बाहेर पडत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती.
पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत संशयिताला लगेचच ताब्यात घेतलं. नाशिकरोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे, पोलिस निरीक्षक गणेश न्याहळे, गुन्हे शोध पथकाचे कर्मचारी अधिका-यांनी घटनास्थळी धाव घेतली, पंचनामा केल्यानंतर नाशिकरोड पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.