महिला खेळाडूंसाठी हेही आव्हान, अशी चाचणी ज्यात स्त्री असल्याचं सिद्ध करावं लागतं, जाणून घ्या काय आहे ‘जेंडर वेरिफिकेशन’?

 मुंबई: जन्म बाईचा बाईचा खूप घाईचा…या एका गाण्यातूनच स्त्रियांना एका जन्मात किती आव्हानांना सामोरं जावं लागतं हे कळतं. विविध जबाबदाऱ्या लीलया पेलणाऱ्या स्त्रिया सध्या प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून तोडीस तोड कामगिरी करत आहेत. क्रिडा क्षेत्रातही स्त्रिया अजिबात मागे नाहीत. याचेच उदाहरण भारताच्या कन्यांनी नुकत्याच ऑलिम्पिक खेळांमध्ये (Tokyo Olympics) केलेल्या कामगिरीवरुन येते. पण असे सर्व असतानाही महिला क्रीडापटूंना आजही बऱ्याच संकटाना तोंड द्यावे लागते.

यातीलच एक म्हणजे ‘जेंडर वेरिफिकेशन’. या विचित्र चाचणीचा बऱ्याच महिला क्रीडापटूंना सामना करावा लागतो. ज्यामध्ये त्यांना स्त्री असल्याचं सिद्ध करावं लागतं. ज्यामुळे अनेक खेळाडूंना मानसिक त्रास होतो. ज्याचा त्यांच्या खेळावरही परिणाम होतो. भारताची महिला धावपटू दुती चंद (Dutee Chand) हिला असा अनुभव काही वर्षांपूर्वी आला होता. यावरच आता रश्मी रॉकेट हा चित्रपट देखील येत असून नुकताच त्याचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

काय आहे हे जेंडर वेरिफिकेशन?

ही चाचणी महिला खेळाडूं खरंच महिला आहेत का? हे सिद्ध करण्यासाठी केली जाते. पुरुष आणि स्त्री यांच्यात बरेच हार्मोन्स वेगवेगळे असतात. यातीलच एक म्हणजे ‘अँड्रोजन’. या हॉर्मोनमुळे पुरुषांमध्ये काही वेगळ्या गोष्टी असतात. ज्यातूनच त्याच्या चेहऱ्यावर केस(दाढी-मिशी), सपाट छाती, भारदस्त आवाज इत्यादी. पण याच गोष्टी जर स्त्रियांमध्ये आढळून आल्या तर त्यांच्या अँड्रोजन या हार्मोनचं प्रमाण अधिक असल्याचं सिद्ध होतं. ज्यानंतर त्यांना रक्त तपासणी सारख्या प्रक्रियांनाही सामोरं जावं लागतं.

या चाचणीत रक्त तपासणीसोबत त्यांच्या टेस्टोस्टेरॉन मर्यादेचीही तपासणी होते. या अधिकता आढळल्यास DNA टेस्ट केली जाते. त्यानंतर त्यांच्या खाजगी भागांचीही तपासणी केली जाते. यानंतर जर संबंधित महिला खेळाडूमध्ये टेस्टोस्टेरॉनचं प्रमाण अधिक असल्यास त्यांना खेळण्यापासून रोखलं जातं. अनेकदा काही महिला खेळाडूंचा शाररिक बांधा पुरुषांप्रमाणे होतो, चेहऱ्यावर केस दिसू लागतात, आवाजातही भारदस्तपणा येतो. ज्यानंतर अशा सगळ्या चाचण्यांना सामोरं जावं लागतं.

काय घडलं होतं दुती चंदसोबत?

तर या जेंडर वेरिफिकेशन चाचणीतून भारताची महिला धावपटू दुती चंद हीला जावं लागलं होतं. 2014 साली दुतीने ताईपेई येथे आयोजित आशियाई  ज्यूनियर एथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये दोन सुवर्णपदकं जिंकली. अवघ्या 18 वर्षाची असताना तिने हा पराक्रम केला. ज्यानंतर ती आगामी कॉमनवेल्थ गेम्सची तयारी करत होती. पण याच दरम्यान तिच्या शरीरात ‘अँड्रोजन’चं प्रमाण अधिक असल्याचं सांगत तिला या कॉमनवेल्थ तसंच आशियाई खेळांमध्ये भाग घेण्यापासून रोखण्यात आलं.

ज्यानंतर दुतीने कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्ट्समध्ये एथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडिया आणि इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ एथलेटिक्स फेडरेशन (IAAF) यांच्या विरोधात याचिका दाखल केली. ज्यानंतर अखेर अधिक अँड्रोजन शरीरात असण्याबाबतची पॉलिसी रद्द करण्यात आली आणि दुती पुन्हा एकदा खेळांमध्ये सहभाग घेऊ लागली.  ज्यानंतर 2018 मध्ये जकार्ता येथे आशियाई खेळांमध्ये दुतीने दोन रौप्य पदकं मिळवली. दरम्यान दुतीच्या या सर्व प्रवासावर रश्मी रॉकेट हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकताच त्याचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area