जुना राजवाडा पोलिसांनी या घटनेची माहिती दिली. फिर्यादी इंद्रजीत बाबुराव पाटील (वय ३१, रा. विश्वतारा अपार्टमेंट, ध्यानचंद हॉकी स्टेडियमजवळ) यांचा प्लॉट देण्याघेण्याचा व्यवसाय आहे. फिर्यादी पाटील यांनी सावकार प्रशांत कुलकर्णी याच्याकडून चार वर्षापूर्वी १० लाख आणि दोन वर्षापूर्वी १५ लाख असे २५ लाख रुपये पाच टक्के व्याजाने घेतले होते. पाटील यांनी पाच टक्के व्याजाने २९ लाख २५ हजार रुपये देऊनही सावकार कुलकर्णी अधिक पैशाची मागणी करत होता. व्याजाच्या पैशाच्या बदली कुलकर्णी याने फिर्यादी पाटील यांच्या वडिलांच्या नावावर असलेला ५०० चौरस मीटर प्लॉट तारण म्हणून मुलगा प्रथमेश याच्या नावे वटमुखत्यार म्हणून लिहून घेतला होता. फिर्यादी पाटील यांनी व्याज आणि मुद्दल न दिल्याने खासगी सावकार कुलकर्णी याने वटमुखत्यार पत्राच्या आधारे दोन फेब्रुवारी २०२१ रोजी फिर्यादीचा प्लॉट हडप करून खरेदीपत्रात असलेली १५ लाख २० हजार रुपयाची रक्कम फिर्यादी पाटील यांना न देता कसबा बावड्यातील दुय्यम कार्यालयात परस्पर प्लॉट स्वत:च्या नावाने करून घेतला.
परस्पर आपला प्लॉट खासगी सावकाराने आपल्या नावे केल्याचे कळताच फिर्यादी पाटील हे चार दिवसांपूर्वी त्यांचा मित्र राजू शिसोदे याला घेऊन कुलकर्णी याच्या घरी गेले. कुलकर्णी पिता पुत्रांची भेट घेऊन पंधरा दिवसात तुमची २५ लाख रुपये मुद्दल भागवतो असे सांगितले. यावर खासगी सावकार कुलकर्णी याने प्लॉट परत देण्यासाठी आणखीन ८८ लाख रुपयांची मागणी केली. ८८ लाख रुपये न दिल्यास सदरचा प्लॉट दुसऱ्या व्यक्तीस विकणार असल्याचे सांगितले. फिर्यादी पाटील यांनी या संदर्भात जुना राजवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यावर खासगी सावकार कुलकर्णी पिता पुत्रावर गुन्हा नोंदवण्यात आला.