Sangli Crime: परप्रांतीय कामगाराने ५ लाखांचे दागिने चोरले; ते गाढ झोपेत असतानाच...

 


सांगली:सांगली शहरातील गणपती पेठ परिसरात एका सोनाराच्या दुकानातील परप्रांतीय कामगारानेच तब्बल पाच लाख रुपयांच्या दागिन्यांवर डल्ला मारला. या प्रकरणी व्यापारी प्रसाद संजय पाटील (वय २५) यांनी सांगली शहर पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी कामगार सुरूख शेख (रा. कलकत्ता) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. ( Sangli City Crime Latest Update )

सांगली शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रसाद पाटील यांचे गणपती पेठ परिसरात संजय राखी सेंटरच्या दुसऱ्या मजल्यावर आदिनाथ चेन्स नावाचे दागिन्यांचे दुकान आहे. दुकानाच्या शेजारीच पाटील हे आपल्या कुटुंबीयांसह राहतात. त्यांच्या दुकानात कोलकात्यातील सुरूख शेख हा गेल्या काही महिन्यांपासून कारागीर म्हणून काम करत होता. याठिकाणी दागिने बनविण्यासाठी सोने ठेवण्यात आले होते. शेख याच दुकानात राहत होता. गुरुवारी पहाटे दोन ते पाच वाजण्याच्या दरम्यान दुकानात कोणीही नसताना त्याने दुकानातील पाच लाख रुपयांचे दागिने घेऊन पळ काढला. यावेळी इमारतीमधील रहिवासी गाढ झोपेत होते.

सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास प्रसाद पाटील हे दुकान उघडण्यासाठी गेले असता, त्यांना कामगार शेख हा कुठे दिसला नाही. परिसरात शोधाशोध केली, तरीही त्याचा थांगपत्ता लागला नाही. दुकानातील दागिने लंपास झाल्याचे निदर्शनास येताच पाटील यांनी शेख याच्या मोबाइलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा मोबाइल बंद होता. दुकानातील सोन्यावर कामगारानेच डल्ला मारल्याचे लक्षात येताच पाटील यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी कारागीर सुरूख शेख याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. कामगारानेच दुकानातील लाखो रुपयांच्या दागिन्यांवर डल्ला मारल्याच्या घटनेने व्यापार पेठेत खळबळ उडाली आहे.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area